Parineeti Chopra | बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. या जोडप्याने रविवारी, एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली, ज्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट-
परिणीती आणि राघव यांनी इंस्टाग्रामवर एक संयुक्त पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “तो अखेर आला… आमचा मुलगा. त्याच्याशिवाय आयुष्य कसं होतं हे आता आठवतही नाही. आमचे हात भरले आहेत आणि मनही भरून आले आहे. आधी आम्ही एकमेकांसोबत होतो, आता आमच्याकडे सर्वकाही आहे… कृतज्ञतेसह, परिणीती आणि राघव,” अशा शब्दात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
यापूर्वी, परिणीतीने ऑगस्ट महिन्यात आपल्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यावेळी तिने “१+१=३” असे लिहिलेल्या केकचा फोटो आणि बागेत फेरफटका मारतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. “आमचे छोटे विश्व… मार्गावर आहे,” असे कॅप्शन तिने दिले होते.
परिणीतीचे आईपणाचे स्वप्न आणि भव्य विवाहसोहळा-
परिणीतीने (Parineeti Chopra) आई बनण्याची इच्छा अनेक वर्षांपूर्वीच व्यक्त केली होती. २०१३ मध्ये ‘फिल्मफेअर’ला (Filmfare) दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, तिला खूप मुले हवी असल्याचे तिने म्हटले होते. “मला एक मूल दत्तक घ्यायला आवडेल. मला खूप मुले हवी आहेत. मी त्या सर्वांना जन्म देऊ शकणार नाही, त्यामुळे मी मुले दत्तक घेईन,” असे तिने सांगितले होते.
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी काही काळ डेटिंग केल्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूर (Udaipur) येथील ‘द लीला पॅलेस’ (The Leela Palace) येथे त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या भव्य लग्नाला बॉलिवूड (Bollywood) आणि राजकारणातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.
News Title – Parineeti chopra and Raghav Welcome Baby Boy






