Ind Vs Pak | २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला आणि या कृत्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप झाला आहे. परिणामी, भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व प्रकारचे संबंध तोडावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीसीसीआयवर (BCCI) दबाव वाढला असून, आयसीसी (ICC) आणि आशिया क्रिकेट काउंसिल (ACC) स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याची मागणी जोर धरत आहे. जर ही मागणी मान्य झाली तर एका वर्षात भारत-पाकिस्तानमधील पाच महत्वाचे सामने रद्द होऊ शकतात.
कोणते सामने होणार प्रभावित? :
आशिया कप 2025:
पुरुषांचा आशिया कप भारतात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने किमान दोन सामने रद्द होऊ शकतात.
महिला वनडे वर्ल्डकप 2025:
राउंड रॉबिन फॉरमॅटनुसार खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना अपेक्षित आहे.
अंडर-19 वर्ल्डकप 2026:
पुढील वर्षी अंडर-19 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना निश्चित आहे.
पुरुषांचा टी20 वर्ल्डकप 2026:
भारतात होणाऱ्या या स्पर्धेतही दोन्ही संघ एकाच गटात येण्याची शक्यता असल्याने पुन्हा एक सामना रद्द होऊ शकतो.
बीसीसीआयच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष :
सध्या बीसीसीआयने या प्रकरणावर कोणतेही अधिकृत पाऊल उचललेले नाही. मात्र देशभरातील वाढत्या रोषामुळे आणि राजकीय दबावामुळे भारतीय क्रिकेट मंडळाला लवकरच मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील १२-१३ वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. केवळ आयसीसी किंवा ACC स्पर्धांमध्येच ते आमनेसामने येतात. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर आता या मर्यादित सामनेही रद्द होण्याची शक्यता वाढली आहे.






