Operation Sindoor | ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये (Bahawalpur) दहशतवादी मसूद अझहरच्या (Masood Azhar) जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammad) मुख्यालयावर, मरकज सुबहान अल्लाहवर (Markaz Subhan Allah), जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अझहर बचावला असला तरी, त्याच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाला आहे.
जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर हवाई हल्ला
भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या आत सुमारे १०० किलोमीटरपर्यंत घुसून बहावलपूरमधील जैशच्या मुख्यालयासह इतर ८ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या निवासस्थानी आता केवळ मृतदेहांची रांग लागली आहे. पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त झाल्यानंतरचे फोटो समोर आले आहेत.
भारताने दहशतवादाविरुद्ध केलेल्या या धडक कारवाईत पाकिस्तानमधील कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. भारताच्या अचूक हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्या अझहरच्या कुटुंबातील तब्बल १० सदस्य जागीच ठार झाले आहेत, तर त्याचे आणखी ४ साथीदारही मारले गेले आहेत.
क्षेपणास्त्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लोकांना घेऊन एक रुग्णवाहिका रुग्णालयात वेगाने पोहोचताना दिसत आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने अधिकृत निवेदन जारी करून या घटनेची पुष्टी केली आहे. हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या अझहरच्या कुटुंबातील सदस्य आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मसूद अझहर हा भारत आणि जगातील सर्वाधिक वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे.
हल्ल्यात मशिदीचे मोठे नुकसान
या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांनी लपण्यासाठी वापरलेली मशीदसुद्धा उध्वस्त झाली आहे. मशिदीच्या व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, हल्ल्यामुळे मशिदीचा एक मोठा घुमट पूर्णपणे कोसळला आहे आणि आतील भागात मोठे नुकसान झाले आहे. मशिदीच्या छताला मोठे भगदाड पडल्याचेही दिसत आहे.
या भीषण हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे निराशाजनक वक्तव्य समोर आले आहे. त्याने म्हटले आहे की, भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात त्याचे १० नातेवाईक मारले गेले आहेत आणि आता त्यालाही मरणाची इच्छा आहे. पाकिस्तानातील बहावलपूर येथील एका मशिदीवर झालेल्या या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची मोठी बहीण आणि तिचा पती, त्याचा एक पुतण्या आणि त्याची पत्नी, त्याची भाची आणि त्याच्या कुटुंबातील पाच निष्पाप मुलांचा समावेश आहे.
बुधवारी रात्रभर बहावलपूरमध्ये झालेल्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांवर शोक व्यक्त करत रस्त्यांवर अंत्ययात्रा काढण्यात आल्या. पाकिस्तानी ध्वजांमध्ये लपेटलेल्या शवपेट्यांचे दुःखद फोटोही समोर आले आहेत.
मंगळवारी रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ले केले. हा हल्ला २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला दिलेले प्रत्युत्तर होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता.
Title : Row of Dead Bodies at Terrorist Masood Azhar’s Home… These Photos from Bahawalpur, Pakistan After Operation Sindoor






