Obesity India 2050 | राष्ट्रीय आरोग्य दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. या अहवालानुसार, 2050 पर्यंत तब्बल 44 कोटी भारतीय लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वाढत्या समस्येबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गंभीर चिंता व्यक्त केली असून, सर्व नागरिकांनी सक्रिय व निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असं आवाहन केलं आहे. (Obesity India 2050)
भारतात लठ्ठपणाचं वाढतं संकट, तरुण वर्ग सर्वाधिक धोक्यात
भारतामध्ये दिवसेंदिवस लठ्ठपणाच्या समस्येत वाढ होत आहे. बदलती जीवनशैली, वेळेवर न झोपणे, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव आणि जंक फूडच्या सेवनामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. विशेषत: तरुण वर्ग यात अधिक प्रमाणात अडकलेला दिसतो. या शारीरिक स्थितीमुळे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर, कोलेस्ट्रॉल आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.
या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, भारतातील लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा भविष्यात लठ्ठपणाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासूनच स्वतःची जीवनशैली बदलणे आवश्यक ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या अहवालाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वतः फिट ठेवण्याचा आणि त्यामुळे देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा संदेश दिला आहे.
लठ्ठपणाविरोधात उपाय – सवयी बदलणे गरजेचे
अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, जास्त वेळ बसून काम करणं, सतत मोबाईल वा स्क्रीनकडे पाहणं, तणाव, आणि चवीनं खाल्ले जाणारे अपोषणीय पदार्थ लठ्ठपणाच्या मुळाशी आहेत. यावर उपाय म्हणून नियमित व्यायाम, सकस आहार, पुरेशी झोप, आणि स्क्रीन टाइम कमी करणे या गोष्टींचा अंगीकार करणं अत्यावश्यक ठरणार आहे.
लठ्ठपणा ही केवळ एक शारीरिक समस्या नसून, ती मानसिक आणि सामाजिक पातळीवरही परिणाम घडवणारी बाब आहे. म्हणूनच, वेळेवर सजग होऊन आपली दिनचर्या सुधारणं आणि शरीराला हलकं ठेवणं ही काळाची गरज ठरली आहे.






