Beed Crime News | बीड जिल्ह्यात ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची कार जाळल्याच्या घटनेच्या काही तासांनंतरच आणखी एक गंभीर प्रकार घडला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे निकटवर्तीय आणि सहकारी पवन करवर (Pawan Karwar) यांच्यावर मध्यरात्री भीषण हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ल्याची धक्कादायक घटना :
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील सावरगाव परिसरातील एका हॉटेलसमोर हा प्रकार घडला. करवर जेवण आटोपून बाहेर पडत असताना हॉटेलमालक प्रवीण जगताप आणि नितीन जगताप यांनी त्यांना अडवले. यावेळी लाठ्या, काठ्या आणि लोखंडी रॉडने त्यांच्यावर बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात करवर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Laxman Hake aide attack)
या घटनेनंतर माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या सलग घटनांमुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Beed Crime News | वाघमारेंच्या कार जाळण्याचा तपास :
याआधी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांच्या कारला पेटवण्यात आले होते. या प्रकरणी विश्वंभर तिरुखे नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
तिरुखे हा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सलग दोन गंभीर घटनांमुळे बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी अतिरिक्त खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.






