Eknath Shinde | गुंड निलेश घायवळ प्रकरणात निर्माण झालेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधत, “महायुतीत दंगा नको,” असा स्पष्ट कानमंत्र दिला आहे. शिंदे यांनी सांगितले की, पुण्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि गोरगरिबांना याचा कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाईल.
गुन्हेगारांना क्षमा नाही, पुणेकरांची सुरक्षा आधी! :
गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सांगितले की, “धंगेकर यांच्याशी बोलणे झाले आहे. पुण्यातील नागरिक आणि विशेषतः महिलांना निर्भयपणे फिरता आले पाहिजे. गुन्हेगारांना क्षमा नाही, ते कोणतेही असोत, त्यांना पाठीशी घातले जाणार नाही.”
शिंदे यांनी पुढे सांगितले की, “गुन्हेगारीमुक्त पुणे व्हावे, हीच पुणेकर जनतेची आणि धंगेकरांचीही अपेक्षा आहे. सरकार म्हणून सर्वसामान्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. गुन्हेगार कितीही प्रभावशाली असो, कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनाही स्पष्ट संदेश गेला आहे की, गुन्हेगारीला शून्य सहनशीलता धोरण लागू राहील.
Eknath Shinde | शेतकऱ्यांसाठी दिलासा :
याच दरम्यान, शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी माहिती दिली. “सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे,” असे त्यांनी सांगितले.
शिंदे पुढे म्हणाले की, “दिवाळी चांगली जावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत आनंद पोहोचावा, हीच आमची इच्छा आहे.” त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सक्षमपणे काम करीत असल्याचे सांगत महायुती सरकार स्थिर आणि जनतेच्या हितासाठी काम करत असल्याचेही स्पष्ट केले.
शिंदे यांच्या या विधानामुळे गायवळ प्रकरणातील राजकीय तणाव काही प्रमाणात शमण्याची शक्यता आहे. तसेच, सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश त्यांनी पुन्हा एकदा दिला आहे.






