Nitin Gadkari | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा इथेनॉल मिश्रित पेट्रोलविषयी सुरू असलेल्या चर्चांना थेट उत्तर दिलं आहे. वाहनांच्या इंजिनवर इथेनॉल मिश्रणाचा अपाय होतो हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही पेट्रोलियम लॉबी जाणूनबुजून खोटी माहिती पसरवत असून त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Nitin Gadkari ethanol statement)
भारतामध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल बाजारात आल्यापासून मायलेज कमी होतो किंवा इंजिनला हानी पोहोचते अशा अफवा पसरल्या. मात्र, गडकरींनी सांगितले की, जगातील अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे इंधन यशस्वीरीत्या वापरले जात आहे. त्यामुळे ई-20 (20 टक्के इथेनॉलयुक्त पेट्रोल) हे सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शेतकऱ्यांना आणि देशाला मोठा फायदा :
गडकरींनी आकडेवारी मांडत सांगितले की, गेल्या चार वर्षांत बिहार आणि उत्तर प्रदेशात मक्याचे उत्पादन तिपटीने वाढले आहे. मक्याच्या दरातही विक्रमी वाढ झाली असून प्रति टन १४-१५ हजारांवरून तो २४-२५ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर क्विंटलचा भाव १,२०० रुपयांवरून तब्बल २,८०० रुपये झाला आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.
भारताने जुलै २०२४ मध्येच पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य केले. प्रदूषण कमी करणे, तेल आयातीवरील अवलंबित्व घटवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, हा या धोरणामागचा मुख्य हेतू असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. (Nitin Gadkari ethanol statement)
Nitin Gadkari | ब्राझीलचा आदर्श व पेट्रोलियम लॉबीवर आरोप :
गडकरींनी ब्राझीलचे उदाहरण देत सांगितले की, तिथे पेट्रोलमध्ये तब्बल २७ टक्के इथेनॉल मिसळले जाते, तरीसुद्धा एकाही वाहनधारकाने याबाबत तक्रार केली नाही. जुन्या वाहनांवरसुद्धा तांत्रिक तपासण्या झाल्या असून कुठलाही धोका सिद्ध झालेला नाही.
काही पेट्रोलियम लॉबी मुद्दाम चुकीची माहिती पसरवत आहेत, असे गडकरींनी सांगितले. इथेनॉल हे शेतकरी आणि देश दोघांसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. स्वच्छ व उत्कृष्ट इंधन म्हणून ते ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करते, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवते आणि परकीय चलनात जाणारा खर्च वाचवते.






