“मी ठेकेदारांकडून कधीही पैसा घेतलेला नाही, ठेकेदार मला घाबरतात”; नितीन गडकरी संतापले

On: September 30, 2025 2:25 PM
Nitin Gadkari
---Advertisement---

Nitin Gadkari | भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (Ethenol) मिसळण्याच्या निर्णयावरून होत असलेल्या टीकेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. गडकरी यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्या या धोरणामुळे आयातीतून फायदा घेणाऱ्या शक्तिशाली लॉबींचं नुकसान झालं असून, तेच आता त्यांच्या विरोधात बदनामी मोहीम राबवत आहेत.

टीकाकारांना गडकरींनी दिले उत्तर

नितीन गडकरी म्हणाले, “कच्च्या तेलाच्या आयातीमुळे देशातून दरवर्षी जवळपास 22 लाख कोटी रुपये बाहेर जात होते. इथेनॉल मिसळल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे, प्रदूषण कमी होत आहे आणि परकीय चलनाची बचतही होत आहे. त्यामुळे काहींच्या व्यवसायावर परिणाम झाला आणि त्यांनी पैशाने बातम्या छापायला सुरुवात केली.”

आपल्यावरील आरोप फेटाळून गडकरी म्हणाले, “मी आजवर कोणत्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही. त्यामुळेच ठेकेदार माझ्यापासून घाबरतात. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण सत्य लोकांना माहीत आहे.”

त्यांनी स्वतःची तुलना फळ देणाऱ्या झाडाशी करत म्हटलं, “जसे लोक फळ देणाऱ्या झाडावर दगड फेकतात, तसेच माझ्यावर टीका होते. पण मी उत्तर देत नाही, कारण त्यामुळेच बातम्या तयार होतात.”

मुलाच्या कंपनीबद्दल वादात सापडले गडकरी

गडकरींचं हे विधान त्यांच्या पुत्र निखिल गडकरी यांच्या CIAN अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज संदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरत आहे. या कंपनीचा महसूल आणि नफा गेल्या वर्षभरात झपाट्याने वाढला आहे. एप्रिल-जून 2024 मध्ये कंपनीचं उत्पन्न फक्त ₹17.47 कोटी होतं, तर 2025 मध्ये ते ₹510.8 कोटींवर पोहोचलं.
नफा देखील ₹52 कोटींवर गेला. शेअर बाजारात (Share Market) कंपनीच्या शेअर्सची किंमत एका वर्षात ₹172 वरून तब्बल ₹2,023 पर्यंत पोहोचली.

या घडामोडींमुळे गडकरींच्या इथेनॉल धोरणाचा त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायाला अप्रत्यक्ष लाभ होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

यावर गडकरींचं म्हणणं आहे की, त्यांचं धोरण केवळ शेतकऱ्यांना उत्पादक बनवणं, प्रदूषण कमी करणं आणि परकीय चलनाची बचत करणं यावर केंद्रित आहे. “मी नेहमी कामावर लक्ष केंद्रीत केलं आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप असतात, पण सत्य कधीच लपून राहत नाही,” असं गडकरी यांनी ठामपणे सांगितलं.

News Title :-Nitin Gadkari angry: “I have never taken money from any contractor; contractors are afraid of me.”

Join WhatsApp Group

Join Now