Nishikant Dubey | भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं असतानाच आता लोकसभेतच मराठी महिला खासदारांनी त्यांना जाब विचारल्याची घटना समोर आली आहे. ‘आपटून आपटून मारू’ असा धमकीवजा सूर दाखवणाऱ्या दुबेंना महिला खासदारांनी लोकसभेच्या लॉबीमध्ये रोखत त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आणि मराठी अस्मितेचा हिसका दाखवला.
वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी घेरले :
लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), प्रतिभा धानोरकर (Pratibha dhanorkar)आणि शोभा बच्छाव यांनी निशिकांत दुबेंना (Nishikant Dubey) शोधून लॉबीमध्ये घेरलं. त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करत ‘तुमचं वर्तन मराठी जनतेचा अपमान करणारे आहे’ असा जाब विचारला. ‘तुम्ही कोणाला आणि कसे आपटून मारणार?’ असा थेट सवाल केल्यानंतर निशिकांत दुबे मात्र नरमले आणि ‘आप तो मेरी बहन है…’ असं म्हणत हात जोडून निघून गेले.
गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. याचदरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त विधान करत “बिहार, उत्तरप्रदेशात या, आपटून आपटून मारू” अशी भाषा वापरली होती. मराठी जनतेचा अपमान करणाऱ्या अशा वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.
Nishikant Dubey | “मराठी लोक आमच्या पैशांवर जगतात” – दुबेंचा आरोप :
निशिकांत दुबेंनी यापूर्वी “मराठी लोकांना कोणते उद्योग आहेत?, किती टॅक्स भरतात?, आमच्या पैशांवर जगतात” असे आक्षेपार्ह आरोप करत संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी केली होती. त्यांनी यावरून ठाकरे बंधूंना देखील उद्देशून “खरोखरच बाळासाहेबांचे वारसदार असाल तर माहीम दर्ग्यात जाऊन उर्दू भाषिकांना मारून दाखवा” असेही आव्हान दिले होते. हे वक्तव्य सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले होते.
या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपल्या शैलीत निशिकांत दुबेंना उत्तर दिलं. “दुबे नावाचा खासदार म्हणतो आम्ही मारू… अरे दुबे, मुंबईत ये… समंदरात डुबे डुबे कर मारेंगे!” असं म्हणत राज ठाकरेंनी देखील भाजप खासदारावर निशाणा साधला. दुबेंच्या विधानावर अजूनही केंद्रीय भाजपकडून स्पष्टीकरण आलेले नाही.






