वातावरण तापणार! “जरांगे शब्द जपून वापरा…”, ‘या’ नेत्याचा जरांगेंना ठणकावून इशारा

On: September 2, 2025 9:31 AM
Maratha Reservation Protest
---Advertisement---

Manoj Jarange | मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू झालेल्या या आंदोलनाला वेगवेगळ्या नेत्यांचा पाठिंबा मिळत असताना, काही नेत्यांकडून जरांगे यांच्यावर सडकून टीका होत आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर जरांगे यांनीही थेट प्रतिउत्तर दिले. या वादात आता निलेश राणे यांनी उडी घेतली असून जरांगे यांना भाषेचा वापर जपून करावा, असा स्पष्ट इशाराच दिला आहे.

निलेश राणेंचा ठणकावलेला इशारा :

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी फेसबुक पोस्ट करत जरांगे यांना थेट शब्दांत बजावले की, “नितेश काही टोकाचं बोलला नाही. एखाद्या मुद्द्यावर त्याने प्रतिक्रिया दिली तर तुम्ही त्यावर वाद करा, पण वैयक्तिक टीका करू नका. कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही. तुम्ही जसे मरायला तयार आहात तसे आम्ही राणे देखील मरायला तयार आहोत.” पुढे बोलताना त्यांनी जरांगे यांना इशारा दिला की, “भाषा जपून वापरली पाहिजे. कारण आमच्या परिवारातील कोणावर हात टाकायची चर्चा झाली तर आम्ही ते कधीच सहन करणार नाही.” (Nilesh Rane warns Manoj Jarange)

निलेश राणे यांनी जरांगे यांच्याशी असलेले जुने संबंध जपण्याची अपेक्षा व्यक्त केली. “मनोज जरांगे, तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे राहिले आहेत. मी ते नाते आजवर जपले आणि पुढेही जपेन. तुमच्याकडूनही तीच अपेक्षा आहे,” असे निलेश राणे म्हणाले. मात्र त्याचबरोबर त्यांनी ‘राणे कोणालाही घाबरत नाहीत’ असे म्हणत वातावरण अधिकच तापवले आहे.

Manoj Jarange | नितेश राणे आणि जरांगे आमने-सामने :

नितेश राणे (Nitesh Rane) हे सुरुवातीपासूनच जरांगे यांच्या आंदोलनावर टीका करत आहेत. जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यावर टीका केल्यानंतर नितेश राणे यांनी त्याला आक्षेप घेतला होता. तसेच, सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची भेट घेतल्यानंतर नितेश राणे यांनी “मी हिंदुत्वाचं काम करतो. मग जिहादी मानसिकतेचे लोक जरांगे यांच्या मंचावर कसे बसतात?” असा सवाल उपस्थित केला होता. यावरून जरांगे यांनीही राणेंवर सडकून टीका केली होती.

आता या साऱ्या घडामोडींमुळे जरांगे-राणे संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. एकीकडे जरांगे यांचे उपोषण सुरू असताना, दुसरीकडे राणे बंधूंच्या टीकास्त्रांमुळे वातावरणात आणखी तणाव निर्माण होत आहे. या वादाचे नेमके रूपांतर कशात होईल, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.

News Title: Nilesh Rane warns Manoj Jarange Patil over remarks, political tension rises

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now