निलेश घायवळचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस! पोलिसांनाही बसला धक्का

On: October 1, 2025 9:37 AM
Nilesh Ghaywal
---Advertisement---

Pune Crime News | गुन्हेगारी क्षेत्रात बस्तान मांडलेल्या निलेश घायवळचा (Nilesh Ghayhwal) अजून एक गुन्हा समोर आला. तो पासपोर्ट घोटाळ्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. हत्या, अपहरण, खंडणीसारखे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर असतानाही त्याने बनावट नाव व पत्ता वापरून सहजपणे पासपोर्ट मिळवला. आश्चर्य म्हणजे, नगरच्या कोतवाली पोलिसांनी दिलेल्या तपास अहवालात ‘नॉट अव्हेलेबल’ एवढाच अभिप्राय पासपोर्ट कार्यालयाला दिला. त्याचा खरा पत्ता पुण्यातला असून त्याने “अहिल्यानगरचा गौरी घुमटानंदी बाजार , कोतवाली , माळीवाडा रोड ४१४००१” हा पत्ता दिला. असा कोणताही पत्ता अस्तित्वात नसतानाही पासपोर्ट कार्यालयाने त्याचा तात्काळ पासपोर्ट मंजूर केला. (Pune Crime News)

घायवळ एवढ्यावरच थांबला नाही त्याने स्वतःच्या अडनावातील “h” काढून ‘Gaywal’ असा स्पेलिंग बदल करून पासपोर्टवर वेगळं नावही वापरलं. सामान्य नागरिकांना पासपोर्टसाठी कठोर कॅरेक्टर व्हेरिफिकेशनचा सामना करावा लागतो, मात्र पोलिस व पासपोर्ट अधिकाऱ्यांनी घायवळच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.या घोटाळ्यामुळे पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी आणि स्थानिक पोलिसांवर संशय निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांना पासपोर्टसाठी कॅरेक्टर व्हेरिफिकेशनची कडक अट लावली जाते पण घायवळसारख्या गुंडाच कॅरेक्टर कोणालाही खटकला नाही, हे अधिकच धक्कादायक ठरले. (Nilesh Ghayhwal Passport)

गुन्हेगाराला कोणाचा पाठिंबा आहे का? :

घायवळने केवळ पुण्यातच नव्हे तर नगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही आपलं बस्तान बसवलं आहे. या भागातील पवनचक्की कंपन्यांना धमकावून त्याने कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केली. या व्यवहारात स्थानिक राजकीय नेत्यांचे त्याला मोठे पाठबळ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. घायवळने नेत्यांना राजकारणात मदत केली, तर बदल्यात त्यांनी त्याच्या बेकायदेशीर कारवायांकडे दुर्लक्ष केलं.

२०२१ मध्ये दरोड्याच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर घायवळवर (Nilesh Ghayhwal) मकोका अंतर्गत कारवाई झाली. त्यावेळी न्यायालयाने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, घायवळने पासपोर्ट जमा केला नाही, आणि पोलिसांनी देखील त्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्याच पासपोर्टचा उपयोग करून सप्टेंबर २०२५ मध्ये तो तीन महिन्यांचा व्हिसा घेऊन युरोपला निघून गेला.

पासपोर्ट विभागातील अनेक कर्मचाऱ्यांवर प्रश्न उभे राहिले :

दरम्यान, कोथरूडमध्ये त्याच्या टोळीने दोन निरपराध नागरिकांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांचे डोळे उघडले. त्याच्यावर बनावट नंबरप्लेट लावण्याचा आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला. पण, पोलिसांकडे सध्या तो भारतात परत येईपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नाही.

घायवळच्या वाढत्या दहशतीमुळे आणि गुंडगिरीमुळे सामान्य नागरिकांचे मात्र हाल सुरू आहेत. निलेश घायवळ प्रकरणामुळे पोलिस आणि पासपोर्ट विभागातील अनेक कर्मचाऱ्यांवर प्रश्न उभे राहिले आहेत. आता तो परत आल्यावर त्याच्यावर किती कठोर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News title : Nilesh Ghayhwal Passport News

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now