Vaishnavi Hagawane | वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death Case) गुन्हा दाखल करण्यात आलेला निलेश चव्हाण याचा इतिहास स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा राहिला आहे. स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश चव्हाणवर (Nilesh Chavan) २०१९ साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा नवा गुन्हा त्याच्यावर दाखल झाल्याने त्याचे ‘काळे कारनामे’ चव्हाट्यावर आले आहेत.
निलेश चव्हाणचे काळे कारनामे उघड
निलेश चव्हाणचे लग्न ३ जून २०१८ रोजी झाले होते. जानेवारी २०१९ मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशने उडवाउडवीची उत्तरे दिली. एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला असता, त्यामध्ये त्यांच्या शारीरिक संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या (Spy camera) साहाय्याने रेकॉर्ड केल्याचे तिला आढळून आले. धक्कादायक म्हणजे, बेडरूममधील लाईट सुरु ठेवून शरीर संबंध ठेवण्यास तो तिला भाग पाडत होता. त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले, ज्यामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला.
पत्नीने याबद्दल जाब विचारला असता, निलेशने घरातील चाकूने तिला धमकावले आणि तिचा गळा दाबला. त्याचबरोबर बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. निलेशच्या पत्नीने निलेशच्या आई-वडिलांना आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती दिली असता, त्यांच्याकडून तिचाच छळ सुरु करण्यात आला. त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश तिच्या पत्नीचा छळ करत राहिला. अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर १४ जून २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला. त्याचा अटकपूर्व जमीनअर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जमीन दिला.
कसपटे कुटुंबीयांना दिली धमकी
निलेश चव्हाणचा बांधकाम व्यवसाय आहे आणि पोकलेन मशीनचा देखील तो व्यवसाय करतो. निलेश चव्हाण हा शशांक हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणून ओळखला जातो. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादामध्ये तो अनेकदा सहभागी असायचा. कर्वेनगर भागातील औदुंबर पार्क सोसायटीत निलेश चव्हाणच्या वडिलांच्या नावे तीन फ्लॅट आहेत. आता कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून निलेश चव्हाण याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० मे रोजी वैष्णवीच्या माहेरचे लोक तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता, निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हिसकावून लावले होते. कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागितल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. वैष्णवीचे काका मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलिसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी धमकावल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक आणि वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे यांचा मित्र आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज (२३ मे) सकाळी पहाटे ४:३० वाजता पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य होते. वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
Title: Disturbing: Nilesh Chavan’s Dark Deeds Exposed; Spy Cameras in Fan, AC to Record Wife’s Intimate Moments; Forced Sexual Relations






