JNPA Chowk Expressway | केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत, जेएनपीए बंदर (पागोटे) (JNPA Port, Pagote) ते चौक (Chowk) दरम्यानच्या नवीन सहा पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे बंदराची वाहतूक अधिक जलद होणार आहे.
४५०० कोटींचा प्रकल्प, BOT तत्त्वावर उभारणी :
हा संपूर्ण महामार्ग ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (Build-Operate-Transfer – BOT) या तत्त्वावर विकसित केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण ४५००.६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प ३० महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रस्तावित महामार्ग हा २९.२१९ किलोमीटर लांबीचा सहा पदरी आणि प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड मार्ग असेल. हा मार्ग जेएनपीए (JNPA) बंदराजवळील पागोटे गावापासून (राष्ट्रीय महामार्ग ३४८) (NH-348) सुरू होईल आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील (National Highway-48) चौक (Chowk) येथे येऊन मिळेल.
JNPA Chowk Expressway | वाहतूक कोंडी फुटणार, २-३ तासांचा प्रवास वाचणार :
सध्या जेएनपीए (JNPA) बंदरातून होणारी वाहतूक आणि २०२५ मध्ये सुरू होणारे नवी मुंबई (Navi Mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळ, यांमुळे कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मोठी गरज आहे. सध्या बंदरातून निघालेल्या वाहनांना पळस्पे फाटा (Palaspe Phata), कळंबोली (Kalamboli) आणि पनवेल (Panvel) येथील प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग किंवा एनएच-४८ गाठण्यासाठी २ ते ३ तास लागतात.
हा नवीन कॉरिडॉर थेट कनेक्टिव्हिटी देईल, ज्यामुळे मालवाहतूक सुरक्षित आणि वेगाने होईल. हा मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालाही (NH-66) जोडणार आहे. या प्रकल्पासाठी १७५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून, यात दोन बोगदे (१९०० मीटर व १५७० मीटर) आणि सहा मोठे पूल (एकूण ९१० मी, २२० मी, २३० मी, ६०० मी, ४४० मी व १६० मी) यांचा समावेश असेल.






