‘हिलिंग पॅच’ ठरणार हृदयरोग्यांसाठी वरदान, रुग्णांना मोठा फायदा होणार

On: February 1, 2025 11:24 AM
New Heart Disease Healing Patch Revolution For Heart Patients
---Advertisement---

Heart Disease Healing Patch | जर्मनीच्या वैज्ञानिकांनी ‘हिलिंग पॅच’ नावाचे एक क्रांतिकारी पॅच विकसित केले आहे, जे हृदयाची दुरुस्ती झटक्यात करू शकते. हे पॅच जगभरातील कोट्यवधी हृदयरुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. या पॅचमुळे हृदयविकाराशी संबंधित गंभीर आजार असलेल्या रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. (Heart Disease Healing Patch)

जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर गॉटिंगेनच्या संशोधकांनी हे हिलिंग पॅच तयार केले आहे. हार्ट ट्रान्सप्लांटची गरज असलेल्या किंवा महागड्या कृत्रिम हार्ट पंपची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांसाठी हे पॅच अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, जगभरात जवळपास ६.४ कोटींहून अधिक हृदयरोगी आहेत. या रुग्णांना हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर), कोरोनरी आर्टरी डिसिज यासारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यांच्यासाठी हे संशोधन वरदान ठरणार आहे.

हृदयाची क्षमता वाढवणार

हे पॅच जीवशास्त्रीय प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले असून, ते हृदयाची आकुंचन क्षमता वाढवण्यास मदत करेल. संशोधनात प्रथमच प्रयोगशाळेत विकसित जैविक प्रत्यारोपणाचा वापर करण्यात आला. त्यामुळे हृदयातील मांसपेशी मजबूत करण्यासोबतच त्या स्थिर करण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे संशोधक इंगो कूटस्का यांनी सांगितले आहे.

रक्तातील पेशींपासून या पॅचची निर्मिती केली आहे. या पेशी स्टेम सेल्सप्रमाणे पुन्हा कार्यान्वित केल्या जातात. या पेशींचे हृदयाचे स्नायू व संयोजी उतींच्या पेशींमध्ये रूपांतर होते. त्यानंतर कोलेजन जेलमध्ये विकसित करून त्या एका विशेष साच्यात टाकल्या जातात. रक्तपेशींपासून तयार केलेला हा पॅच षटकोनी आकाराचा असून, तो ५ बाय १० सेंटीमीटर आकाराच्या पडद्यावर लावला जातो.

युवा स्नायू प्रत्यारोपणाप्रमाणे करणार काम

हृदयरोगाची समस्या असणाऱ्या रुग्णात युवा स्नायू प्रत्यारोपण केल्याप्रमाणे ‘हिलिंग पॅच’ कार्य करत असल्याचा दावा या संशोधनाचे सहलेखक प्रा. वोलफाम-ह्यूबर्टस यांनी केला आहे. या उपकरणामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Title : New Heart Disease Healing Patch Revolution For Heart Patients

 

Join WhatsApp Group

Join Now