Nepal Violence | नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या Gen Z आंदोलनाने गंभीर रूप धारण केले असून परिस्थिती पूर्णपणे अस्थिर झाली आहे. भ्रष्टाचार आणि स्वातंत्र्यावरील बंधनांविरोधात सुरू झालेल्या या चळवळीमुळे अखेर देशाचे सरकारच कोसळले आहे. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अशा स्थितीत नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य आपत्कालीन परिचालन केंद्राने काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या नेपाळी तरुणांनी प्रशासनाविरोधात उग्र भूमिका घेतली. सुरुवातीला शांततेत सुरू असलेले हे आंदोलन पोलिसांच्या कारवाईनंतर हिंसक झाले. या संघर्षात 19 आंदोलकांचा मृत्यू झाला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अखेर सरकार कोसळले आणि लष्कराने सत्ता हाती घेतली. लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिगडेल यांनी नागरिकांना हिंसा थांबवून चर्चेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. (Nepal Violence)
महाराष्ट्र सरकारच्या सूचना :
या गंभीर परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी काही विशेष निर्देश देण्यात आले आहेत. सध्या नेपाळचा प्रवास टाळावा, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. जे नागरिक आधीपासूनच नेपाळमध्ये आहेत, त्यांनी घरात सुरक्षित राहून अनावश्यकपणे बाहेर पडू नये. स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावासाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
कोणत्याही अडचणीसाठी भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांतूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आपत्कालीन परिचालन केंद्र देखील सातत्याने नागरिकांच्या संपर्कात आहे.
Nepal Violence | उपलब्ध हेल्पलाइन नंबर :
भारतीय दूतावास, नेपाळ:
+977-980 860 2881 (व्हॉट्सॲप कॉलसाठी उपलब्ध)
+977-981 032 6134 (व्हॉट्सॲप कॉलसाठी उपलब्ध)
महाराष्ट्र राज्य आपत्कालीन परिचालन केंद्र:
91-9321587143 (व्हॉट्सॲप कॉलसाठी उपलब्ध)
91-8657112333 (व्हॉट्सॲप कॉलसाठी उपलब्ध)
नेपाळमधील सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने महाराष्ट्रातील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या या सूचनांचे पालन केल्यास नागरिकांचा जीवितहानीचा धोका टाळता येईल. दरम्यान, लष्कराच्या हस्तक्षेपानंतर पुढील काही दिवसांत परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






