Social Media Ban | डिजिटल युगात सोशल मीडिया दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. सकाळच्या शुभेच्छांपासून रात्रीच्या गुड नाईटपर्यंत लोक फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X शिवाय दिवसाची कल्पना करू शकत नाहीत. मात्र, भारताचा शेजारी देश नेपाळने या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
बंदीचे कारण काय? :
नेपाळ सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना देशात नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. २८ ऑगस्ट २०२५ पासून पुढे ७ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. मात्र, फेसबुक (मेटा), इन्स्टाग्राम, X, युट्यूब आणि लिंक्डइन यांनी दिलेल्या मुदतीत नोंदणी केली नाही. परिणामी सरकारने तात्काळ प्रभावाने या प्लॅटफॉर्मवर बंदी लागू केली आहे. (Social Media Ban)
सरकारने यापूर्वीच संबंधित कंपन्यांना स्पष्ट इशारा दिला होता. नियमांचे पालन न केल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Social Media Ban | कोणते प्लॅटफॉर्म नोंदणीकृत झाले? :
नेपाळमध्ये यापूर्वी टीकटॉक, व्हीटॉक, वायबर आणि निंबज यांची नोंदणी करण्यात आली आहे. तर टेलिग्राम आणि ग्लोबल डायरी हे अजून नोंदणी प्रक्रियेत आहेत. त्यामुळे हे ॲप्स नेपाळमध्ये सुरळीत सुरू आहेत.
मात्र, मेटा कंपनीच्या ताब्यातील फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, तसेच युट्यूब, ट्विटर (X) आणि लिंक्डइन यांनी नोंदणी प्रक्रियेला प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर बंदी आली आहे. (Nepal Bans Facebook, Instagram & X)
दरम्यान सरकारने स्पष्ट केले आहे की, संबंधित कंपन्यांनी नेपाळमध्ये नोंदणी पूर्ण केल्यानंतर आणि सरकारच्या अटी-शर्तींची पूर्तता केल्यानंतर या प्लॅटफॉर्मना पुन्हा परवानगी दिली जाईल. म्हणजेच ही बंदी कायमस्वरूपी नसून, नियमांचे पालन झाल्यावर ती उठवली जाऊ शकते.






