Rupali Thombre | राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांच्यात नवा वाद उफाळून आला आहे. एका महिलेच्या फेसबुक लाईव्हवरून (Facebook Live) ही ठिणगी पडली असून, रुपाली ठोंबरे यांनी थेट चाकणकरांवरच आपल्याला बदनाम करण्यासाठी कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
वादाची सुरुवात फलटण प्रकरणावरून? :
साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून हा वाद सुरू झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केलेल्या काही वक्तव्यांवरून त्यांच्यावर टीका होत होती.
याच दरम्यान, रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन, त्यांचा फोन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लावून दिला. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी चाकणकरांच्या भूमिकेबद्दल अजित पवारांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हाच राजकीय डाव चाकणकरांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे.
Rupali Thombre | माधवी खंडाळकरांचे फेसबुक लाईव्ह आणि ठोंबरेंचा हल्लाबोल :
या घटनेनंतर, माधवी मंदार खंडाळकर (Madhavi Khandalkar) नावाच्या एका महिलेने फेसबुक लाईव्ह करून रुपाली ठोंबरे यांच्यावर मारहाणीचा आरोप केला. मात्र, माधवी यांनी नंतर या आरोपातून माघार घेतली.
रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी मात्र यामागे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचाच हात असल्याचा प्रतिआरोप केला आहे. “महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीच माधवी खंडाळकर यांना हा व्हिडिओ करण्यासाठी प्रवृत्त केले. हा माझ्यावरील राजकीय बदला घेण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वीही चाकणकरांनी अनेक महिलांना धमक्या देऊन असे व्हिडिओ तयार करायला लावले आहेत,” असा हल्लाबोल ठोंबरे यांनी केला. “एवढेच असेल तर ग्राऊंडवर कामानिशी लढा,” असे थेट आव्हानही रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांना दिले आहे.






