Nashik Traffic Change | हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी! या पार्श्वभूमीवर नाशिकमधील प्रमुख बाजारपेठा खरेदीदार आणि विक्रेत्यांनी फुलून गेल्या आहेत. शहरातील सराफ बाजार, भद्रकाली परिसर, शालिमार, रविवार कारंजा यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूककोंडी नियंत्रित ठेवण्यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. (Nashik Traffic Change)
15 ऑक्टोबरपासून ते 23 ऑक्टोबरपर्यंत शहरातील सात प्रमुख मार्गांवर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी असेल. या कालावधीत संबंधित मार्गांवर वाहनांची ये-जा थांबवण्यात आली असून, पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त किरीथिका सी. एम. यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, तिचे पालन करणे सर्व वाहनचालकांना बंधनकारक आहे.
या सात मार्गांवर राहील प्रवेशबंदी :
दिवाळीपूर्व गर्दी लक्षात घेता, वाहतुकीसाठी खालील प्रमुख रस्त्यांवर बंदी लागू करण्यात आली आहे:
मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजा, दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉइंट, रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर भद्रकाली, बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, नेपाळी कॉर्नर ते मेन रोड, रेडक्रॉस सिग्नल ते धुमाळ पॉइंट आणि रविवार कारंजा ते धुमाळ पॉइंट हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील.
या ठिकाणी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे बाजारपेठ परिसरात होणारी वाहतूककोंडी टळेल आणि पादचारी व नागरिकांची हालचाल सुलभ होईल, असा पोलिस प्रशासनाचा हेतू आहे.
Nashik Traffic Change | पर्यायी मार्ग व पार्किंगची व्यवस्था :
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मालेगाव स्टॅण्डकडून येणारी वाहने मखमलाबाद नाका–रामवाडीमार्गे हनुमानवाडी लिंकरोडवरून पुढे जाऊ शकतात. पंचवटीकडून येणारी वाहने संतोष टी पॉइंटवरून द्वारकामार्गे पुढे जातील, तर सीबीएस किंवा शालिमारकडून जुने नाशिककडे जाणारी वाहने शालिमार–गंजमाळ दूधबाजार चौक रस्ता वापरू शकतात.
तसेच सागरमल मोदी विद्यालय, बी. डी. भालेकर मैदान (शालिमार), स्मार्ट सिटीने निर्धारित केलेल्या जागा, गोदाकाठालगत आणि गाडगे महाराज पुलाखाली पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना गर्दीची ठिकाणे टाळून, पर्यायी मार्गांचा स्वयंस्फूर्तीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.






