Nashik | नाशिक (Nashik) जिल्ह्यातील घोटी (Ghoti) परिसरात असलेल्या एका शाळेमधून एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इथं आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरातून काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्या असून, या प्रकारामुळे पालक, शिक्षक आणि स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
दप्तर तपासणीत सापडल्या धोकादायक वस्तू-
शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी शिस्तीच्या दृष्टीने अचानक विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली. या तपासणीत तब्बल ५ ते ६ विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये फायटर, सायकलच्या साखळ्या, लोखंडी कडे, कंडोमची पाकिटं, तसेच पत्त्यांचे कॅट आणि काही अमली पदार्थही आढळून आले. ही दृश्यं पाहून शिक्षकही क्षणभर सुन्न झाले.
या मुलांनी (Nashik) आपल्या दप्तरात इतक्या प्रमाणात हिंसक व अश्लील वस्तू कशा आणल्या, याचा शोध घेण्याचं काम शाळा प्रशासनाने सुरू केलं आहे. प्राथमिक चौकशीत या विद्यार्थ्यांनी काही प्रकारची नशा देखील केल्याचे निदर्शनास आले असून, शिक्षकांनी याविषयी पालकांना माहिती दिली आहे.
विद्यार्थी करत होते नशा-
या प्रकारानंतर शाळेत तातडीने शिस्तबद्धता आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार असल्याचं शाळेच्या प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. काही शिक्षकांनी सांगितलं की या विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे संकेत मिळाले आहेत, त्यामुळे हा विषय केवळ शाळेपुरता न ठेवता पोलीस व पालकांच्या समन्वयाने सोडवण्यावर भर देण्यात येईल.
या प्रकारामुळे इतर विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून शाळेने आता सतत दप्तर तपासणी, मार्गदर्शन शिबिरं व पालक मीटिंग्स आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.






