Nashik Traffic Rules | नाशिक (Nashik) शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात खासगी बस आणि जड वाहनांच्या प्रवेशावर लागू असलेली बंदी पुढील तीन महिन्यांसाठी कायम ठेवण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार ही निर्बंधात्मक अधिसूचना आता 31 मे 2026 पर्यंत लागू राहणार असून, शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सकाळी 8 ते रात्री 10 प्रवेशबंदी :
सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांना वेग देण्यात आला आहे. रस्त्यांचे रुंदीकरण, दुरुस्ती तसेच विविध विकासकामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खासगी बस तसेच अवजड वाहनांवर निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नवीन नियमानुसार सकाळी 8 ते रात्री 10 या कालावधीत खासगी बस आणि जड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास मनाई राहणार आहे. मात्र सकाळी 8 वाजण्यापूर्वी आवश्यक वाहने शहरातून मार्गस्थ होऊ शकतात. या निर्णयामुळे शहरातील मुख्य मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करून व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
Nashik Traffic Rules | वाहतुकीचे मार्ग बदलले :
द्वारका सिग्नल ते सारडा सर्कल आणि काठे गल्ली या भागात ‘ग्रेड सेप्रेटर’चे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत. या कामामुळे वाहनांची वळवणूक मुंबई नाका आणि टाकळी या मार्गांनी करण्यात आली आहे. कार आणि दुचाकींसाठी पर्यायी रस्ते निश्चित करण्यात आले असून वाहतूक पोलिसांकडून या मार्गांवर सातत्याने नियंत्रण ठेवले जात आहे. (private bus ban)
खासगी ट्रॅव्हल्स बसमुळे द्वारका, मुंबई नाका, रुची हॉटेल परिसर, महामार्ग बसस्थानक, ठक्कर बाजार, ट्रॅक्टर हाउस, तिगरानिया रोड, कन्नमवार पूल आणि रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे निरीक्षणात आले होते. त्यामुळे प्रशासनाने खासगी बसचे सर्व थांबे, पिकअप-ड्रॉप पॉइंट तसेच पार्किंग व्यवस्था रद्द केली आहे. आता खासगी बसमधील प्रवाशांना तपोवन सिटीलिंक बस टर्मिनल येथेच उतरवणे आणि बसवणे बंधनकारक करण्यात आले असून बस पार्किंगची सुविधाही त्याच ठिकाणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Nashik Traffic Rules)
यासोबतच शहरातील सुमारे 29 रस्त्यांवर दुरुस्ती आणि रुंदीकरणाची कामे सुरू असून पाच उड्डाणपुलांच्या बांधकामामुळेही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त किरिथिका सी.एम. (Kirithika C.M.) यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.






