Eknath Shinde | शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. या संभाव्य एकजुटीवर आता भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी संताप व्यक्त केला असून, त्यांनी थेट इशारा दिला आहे की, “असं झालं तर आम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडू.”
कणकवलीत शिंदे-ठाकरे गटांच्या बैठकीची चर्चा :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या (Kankavali Nagarpanchayat) निवडणुकीसाठी दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. “शहर विकास आघाडी” या नावाने या दोन गटांची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या एका गुप्त बैठकीत माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत (Satish Sawant) यांसारखे स्थानिक नेते उपस्थित होते. या बैठकीत नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन्ही गट एकत्र येऊ शकतात का, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे (Narayan Rane) यांनी कडाडून विरोध दर्शविला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर शिंदे गटाने ठाकरे गटाशी हातमिळवणी केली, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही शिंदे गटाशी संबंध तोडू.
Eknath Shinde | राणेंचा शिंदे आणि ठाकरे गटावर तीव्र निशाणा :
सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटावर थेट टीका केली. “विशाल परब आणि राजन तेली मला मान्य नाहीत. प्रतिष्ठित नागरिकांमध्ये राजन तेली बसत नाही. सर्वांनी टाकून दिलेलं एकनाथ शिंदे का जमा करतोय?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, “विशाल परब मला भेटू दे, मग तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल,” असं म्हणत त्यांनी राजकीय वातावरण तापवलं.
राणेंनी पुढे सांगितले की, “मी जिल्ह्यात युती व्हावी असं म्हणतोय, पण जागावाटप उद्या ठरेल.” मात्र शिंदे गटाने ठाकरे गटाशी हातमिळवणी केली, तर भाजप त्यांचा पाठिंबा काढून घेईल, असा इशाराच त्यांनी दिला.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही राणेंचा हल्ला :
गेल्या काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाढत्या भेटींवरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या विषयावर भाष्य करताना नारायण राणेंनी म्हटलं की, “बंधूंच्या भेटी होत आहेत, पण सत्ता मिळवण्याची ताकद दोघांमध्ये नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय केलं? आता फक्त आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यांचं अस्त्र संपत चाललंय.”
राणेंनी पुढे सांगितले की, “आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी दोघं बोलत आहेत. जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती तेव्हा मुंबईची अवस्था बघा, आणि आता काय आहे तेही बघा,” असं म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली.






