Nanded Election Result | नांदेड महानगरपालिका निवडणुकीचा निकाल समोर आला असून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालात सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला बसला असून, त्यांच्या गटाला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असतानाच नांदेडमध्येही भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकलं आहे.
मुंबई, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांनंतर नांदेड महापालिकेतही भाजपचा प्रभाव स्पष्ट दिसून आला आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटासाठी नांदेडमध्ये ‘भोपळाही न फुटणं’ ही बाब राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानली जात आहे. यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसमोर नव्या अडचणी उभ्या राहण्याची चिन्हं दिसत आहेत.
Nanded Election Result | नेमका निकाल काय? :
नांदेड महापालिकेच्या (Nanded Mahapalika) एकूण 81 जागांसाठी मतदान झालं होतं. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने 40 जागांवर विजय मिळवला असून, आणखी काही जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपचा महापौर निश्चित मानला जात आहे. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेला मर्यादित यश मिळालं असून, काही जागांवर विजय आणि काहींवर आघाडी आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुमारे सात जागांवर यश मिळालं आहे. काँग्रेस आणि इतर आघाडी पक्षांना मिळून काही जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एमआयएम पक्षानेही नांदेडमध्ये आपली उपस्थिती ठळक करत चार जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं शून्य खातं.
Nanded Election Result | भाजपचा गड मजबूत, ठाकरे गटाला मोठा धक्का :
या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी मोठी ताकद लावली होती. सभा, बैठका आणि घराघरात संपर्क साधत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. नांदेड ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई मानली जात होती आणि निकालातून त्यांनी आपला प्रभाव सिद्ध केला आहे. भाजपच्या या विजयामुळे नांदेडमध्ये सत्ता परिवर्तन स्पष्ट झालं आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटासाठी हा निकाल गंभीर इशारा मानला जात आहे. शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव असलेल्या मराठवाड्यातील महत्त्वाच्या शहरात एकही जागा न मिळणं हे राजकीयदृष्ट्या मोठं अपयश मानलं जात आहे. यामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, पुढील राजकीय रणनीतीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Nanded Municipal Corporation)
राज्यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजपचा प्रभाव वाढताना दिसत असून, नांदेडचा निकाल या प्रवाहाला अधिक बळ देणारा ठरला आहे. ठाकरे गटासाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा क्षण ठरत असून, आगामी निवडणुकांपूर्वी मोठ्या बदलांची गरज असल्याचं संकेत मिळत आहेत.






