Pune: नांदेड गावात पाण्याच्या टाकीत डुक्कर मरून पडल्याने पसरतोय आजार?, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

On: January 24, 2025 3:52 PM
Nanded City, Pune
---Advertisement---

Pune News: पुण्यातील नांदेड सिटी (Nanded City, Pune), सिंहगड रोड आणि परिसरात सध्या गुईलेन बॅरी सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) या गंभीर आजाराने डोके वर काढले असतानाच, नागरिकांमध्ये एका वेगळ्याच प्रकारची भीती पसरली आहे. नांदेड गावातील पाण्याच्या टाकीत डुक्कर मरून पडल्याने या भागातील रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, प्रशासनाकडून या मेसेजचे खंडन करण्यात आले असून, हा मेसेज पूर्णपणे खोटा आणि अफवा पसरवणारा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दुसरीकडे, गुईलेन बॅरी सिंड्रोमचा धोका मात्र खरा असून, या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत शहरात या आजाराचे 67 हून अधिक रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी बहुतांश रुग्ण हे सिंहगड रोड(Sinhgad Road) नांदेड गाव, नांदेड सिटी(Nanded City, Pune), धायरी(Dhayari), कोल्हेवाडी, किरकिटवाडी(Kirkitwadi) शिवणे (Shivane), उत्तमनगर(Uttamnagar), नांदोशी आणि खडकवासला (Khadakwasla) या भागातील आहेत. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी सतर्क राहणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

गुईलेन बॅरी सिंड्रोम कशामुळे होतो?

गुईलेन बॅरी सिंड्रोम हा एक दुर्मिळ स्वयंप्रतिरोधक (Autoimmune) आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे मज्जातंतूंना सूज येते आणि परिणामी स्नायूंमध्ये कमजोरी येते. या आजाराचे नेमके कारण अद्याप अज्ञात आहे, परंतु अनेकदा श्वसन किंवा पोटाच्या विषाणू संसर्गानंतर हा आजार बळावतो. काही प्रकरणांमध्ये, बॅक्टेरियाचा संसर्ग, शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतरही हा आजार होऊ शकतो.

गुईलेन बॅरी सिंड्रोम होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

गुईलेन बॅरी सिंड्रोम पूर्णपणे टाळण्याचा कोणताही निश्चित मार्ग नाही. मात्र, काही खबरदारीच्या उपायांमुळे याचा धोका कमी करता येऊ शकतो. यामध्ये वैयक्तिक स्वच्छता राखणे, हात वारंवार धुणे, उघड्यावरील अन्न खाणे टाळणे, पाणी उकळून आणि गाळून पिणे, फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खाणे यांचा समावेश होतो. तसेच, श्वसन किंवा पोटाचा संसर्ग झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

पुण्यात (Pune) या आजाराचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वतः नांदेड (Nanded City, Pune) परिसरातील विहिरींची पाहणी केली असून, पाणी तपासणीचे आदेश दिले आहेत. बाधित रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये आरोग्यविषयक सर्वेक्षण केले जात आहे. तसेच, पाण्याच्या नमुन्यांची नियमित तपासणी करण्यात येत आहे.

Pune: नांदेड सिटी भागातील लोकांनी काळजी घ्यावी-

कोरडेबाग, नांदेड सिटी येथील वर्पे क्लिनिकच्या (Varpe Clinic) डॉ. अश्विनी पाटील-वर्पे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “गेल्या काही दिवसांपासून आपल्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंटमध्ये पोटदुखी, जुलाब, डायरिया अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. गुईलेन बॅरी सिंड्रोम आजाराची लक्षणं असलेले काही पेशंट आलेले होते, त्यांच्यावर योग्य उपचार केले आहेत. मात्र लोकांनी या आजाराला घाबरुन जाण्याचं कारण नाही. कारण हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. फक्त लोकांनी काळजी घ्यावी. बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून आणि गाळून प्यावे, फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खा. वैयक्तिक स्वच्छता राखा आणि पोटदुखी, जुलाब, उलट्या यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका-

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना योग्य ती माहिती दिली जात आहे. त्यामुळे घाबरून न जाता सतर्क राहणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक मेसेजची खातरजमा केल्याशिवाय तो पुढे पाठवू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे.

संबंधित बातम्याः

पुण्यात गुईलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला; सिंहगड रोड, नांदेड, धायरी परिसर हॉटस्पॉट!

पुण्याच्या नांदेड सिटी आणि परिसरातील नागरिक हैराण, ‘या’ आजारानं काढलं डोकं वर

सिंहगड रोड परिसरातील नागरिकांनो सावधान! गाडी थांबवणारांपासून सतर्क राहा!

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; पुण्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चं थैमान, नेमका आजार काय?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now