Nana Patekar | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांना लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी दिलासा मिळाल्याचे वृत्त आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) यांनी 2018 मध्ये ‘मी टू’ मोहिमेंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र, पुराव्याअभावी पोलिसांनी ‘B समरी रिपोर्ट’ न्यायालयात सादर केला होता. आता अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळून लावला आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. मात्र, तनुश्री दत्ताच्या वकिलांनी यावर वेगळे मत मांडले आहे.
न्यायालयाचा निर्णय-
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya), दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी (Abdul Sami Siddiqui) आणि निर्माता राकेश सारंग (Rakesh Sarang) यांच्याविरोधात 2008 मध्ये लैंगिक छळ आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. ही घटना ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडल्याचा तिचा आरोप होता. मात्र, तपासानंतर मुंबई पोलिसांनी पुराव्याअभावी ‘B समरी रिपोर्ट’ न्यायालयात सादर केला होता.
आता अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने हा समरी रिपोर्ट फेटाळून लावला असला तरी तनुश्री दत्ताची तक्रार अजूनही न्यायालयात प्रलंबित असल्याचे तिचे वकील नितीन सातपुते (Nitin Satpute) यांनी स्पष्ट केले आहे.
नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया-
नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटले होते, “माझ्यावर झालेले आरोप खोटे होते, त्यामुळे मला त्याचा राग येण्याचा प्रश्नच नव्हता. जे घडलेच नाही, त्यावर मी काय बोलणार? कोणीतरी येतं आणि अचानक असे आरोप करतं, तर त्यावर उत्तर देणं गरजेचं नव्हतं.”
या निर्णयानंतर नाना पाटेकर यांच्या चाहत्यांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. मात्र, तनुश्री दत्ताने हे प्रकरण सोडलेले नसून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
न्यायालयाचा निर्णय अंतिम नाही?
तनुश्री दत्ताच्या वकिलांनी स्पष्ट केले की, ओशिवारा पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेला ‘B समरी रिपोर्ट’ फेटाळण्यात आला आहे, पण याचा अर्थ तक्रारच फेटाळली गेली असे नाही. आता पोलिसांना पुढील निर्णय घ्यावा लागेल – ते आरोपपत्र दाखल करू शकतात किंवा हा निर्णय उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.
या निर्णयामुळे नाना पाटेकर यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी केस अद्याप संपलेली नाही. त्यामुळे याप्रकरणात आणखी काय घडामोडी होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






