Buldhana | बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव (Shegaon), नांदुरा (Nandura) आणि खामगाव (Khamgaon) तालुक्यात गेल्या डिसेंबरपासून सुरू झालेल्या केसगळतीच्या (Hair loss) गूढ प्रकाराला आता गंभीर वळण लागले आहे. ज्या नागरिकांना केसगळतीचा त्रास झाला होता, आता त्यांची नखे गळू (Nail loss) लागल्याने परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
केसगळती पाठोपाठ नखांची समस्या
डिसेंबर महिन्यापासून अनेक गावांमधील नागरिक अचानक केस गळण्याच्या समस्येने त्रस्त होते. आता त्याच रुग्णांपैकी अनेकांची नखे कमकुवत होऊन विद्रूप होत असल्याचे आणि काही रुग्णांची नखे गळून पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विचित्र आजारामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत आरोग्य प्रशासनाने केवळ तपासण्या आणि रक्ताचे नमुने घेतले. आयसीएमआरच्या (ICMR) पथकानेही भेट दिली, पण अद्याप कोणताही ठोस उपचार मिळालेला नाही किंवा आयसीएमआरचा अहवालही जाहीर झालेला नाही. त्यामुळे प्रशासन काहीतरी लपवत असल्याचा आणि आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
आरोग्य विभागाची भूमिका
या प्रकरणी बुलढाणा आरोग्य अधिकारी (वर्ग १) डॉ. अनिल बनकर (Dr. Anil Bankar) यांनी माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार, सध्या चार गावांमध्ये नखांच्या समस्येने त्रस्त असलेले एकूण २९ रुग्ण आढळून आले आहेत, ज्यांना आधी केसगळतीचा त्रास झाला होता. या रुग्णांमध्ये नखे कमकुवत होणे आणि गळून पडणे अशी लक्षणे दिसत आहेत.
या २९ रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात (Shegaon Sub-District Hospital) जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शरीरातील सेलेनियमचे (Selenium) प्रमाण वाढल्यामुळे ही समस्या उद्भवत असावी, असा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. निश्चित कारण मात्र आयसीएमआरच्या अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल.
Title : Nail Loss Follows Hair Loss in Buldhana Villages, Causes Panic






