Health Insurance | वाढत्या वयानुसार आरोग्य विम्याचे (Health Insurance) हप्ते महाग होत जातात, ज्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) विमा घेणे परवडत नाही. मात्र, काही गोष्टी विचारात घेतल्यास आणि योग्य योजनेची निवड केल्यास ज्येष्ठ नागरिकांनाही तुलनेने स्वस्त दरात आरोग्य विमा संरक्षण मिळवणे शक्य आहे.
डिडक्टिबल आणि को-पे चा पर्याय
अनेक विमा कंपन्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आरोग्य विमा योजना (Health Insurance Plans) देतात. या योजनांची तुलना करून योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे. प्रीमियम कमी करण्यासाठी ‘डिडक्टिबल’ (Deductible) आणि ‘को-पे’ (Co-pay) सारख्या तरतुदी असलेल्या पॉलिसीचा विचार करता येतो.
डिडक्टिबल म्हणजे विम्याच्या दाव्यातील सुरुवातीची एक ठराविक रक्कम विमाधारकाने स्वतः भरायची असते. उदाहरणार्थ, १ लाखाचे डिडक्टिबल असल्यास, ८ लाखांच्या क्लेमपैकी पहिले १ लाख रुपये विमाधारक भरतो आणि उर्वरित रक्कम विमा कंपनी देते. ‘को-पे’ मध्ये एकूण बिलाच्या काही टक्के रक्कम (उदा. २०%) विमाधारकाला भरावी लागते. यामुळे विम्याचा हप्ता कमी होतो.
सुपर टॉप-अप
गंभीर आजारांसाठी किंवा मोठ्या खर्चाच्या उपचारांसाठी जास्त कव्हरेज हवे असल्यास, कमी हप्त्यात ‘सुपर टॉप-अप’ (Super Top-up) प्लॅन घेणे फायद्याचे ठरू शकते. तुमची मूळ पॉलिसीची मर्यादा संपल्यानंतर सुपर टॉप-अप प्लॅन खर्चाचा भार उचलतो. जसे ३ लाखांची मूळ पॉलिसी असेल आणि ७ लाखांचे बिल आले, तर उर्वरित ४ लाख सुपर टॉप-अपमधून मिळू शकतात.
आरोग्य विमा ३ वर्षांसाठी एकत्रित घेतल्यास हप्त्यावर १५% पर्यंत सवलत मिळू शकते. तसेच, विमा जितक्या कमी वयात घेतला जाईल, तितका त्याचा हप्ता कमी असतो. त्यामुळे, विविध पर्यायांची माहिती घेऊन आणि आपल्या गरजेनुसार योग्य योजना निवडल्यास ज्येष्ठांनाही परवडणारा आरोग्य विमा मिळू शकतो.






