Best Movies 2025 | हिंदी चित्रपटसृष्टी मनोरंजनाचे मोठे माध्यम असले तरी, २०२५ मध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. धाडसी कथा, नवीन दृष्टिकोन आणि अप्रतिम व्हिज्युअल्समुळे या चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर नेटफ्लिक्स (Netflix), सोनी लिव्ह (SonyLIV), झी५ (ZEE5) आणि जिओहॉटस्टार (JioHotstar) यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली छाप सोडली आहे.
गुन्हेगारी, कायदा आणि सूडाचा थरार :
या वर्षी आलेल्या काही क्राईम थ्रिलर चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. यामध्ये ‘थुडरम’ (Thudarum) या क्राईम थ्रिलरची विशेष चर्चा आहे. या चित्रपटाची कथा एका माजी स्टंटमॅनभोवती फिरते, जो आता टॅक्सी ड्रायव्हर बनला आहे. त्याची आवडती अँबेसेडर गाडी जप्त केली जाते आणि त्याचवेळी त्याच्या मुलाची रहस्यमयरित्या हत्या होते, तेव्हा त्याच्या आयुष्यात एक मोठे वादळ येते. या घटनेचा तपास करताना तो एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश करतो. (Best Movies 2025)
याच धाटणीचा आणखी एक चित्रपट म्हणजे एका तरुण वकिलाच्या संघर्षावर आधारित लीगल ड्रामा. यात एक ज्युनियर वकील एका अल्पवयीन मुलासाठी न्यायाची लढाई लढतो, ज्याला खोट्या पॉक्सो (POCSO) केसमध्ये अडकवलेले असते. हा चित्रपट भारतीय न्यायव्यवस्थेतील त्रुटी आणि सामर्थ्यशाली लोकांकडून होणारा सत्तेचा गैरवापर अत्यंत प्रभावीपणे मांडतो, जो प्रेक्षकांना अंतर्मुख करतो.
Best Movies 2025 | पोलिसी तपास आणि भूतकाळातील रहस्ये :
मल्याळम चित्रपटसृष्टीतील एका पोलीस ड्रामानेही प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यात रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या दोन पोलिसांची कथा दाखवण्यात आली आहे. काही लहान-सहान प्रकरणांचा तपास करता करता ते गुन्हेगारीच्या अशा जाळ्यात अडकतात, जिथे त्यांची नैतिकता आणि जीव दोन्ही पणाला लागलेले असतात. हा चित्रपट पोलिसांच्या कामातील ताण आणि मानसिक संघर्ष उत्तमरीत्या दाखवतो.
यासोबतच, ‘रेखाचित्रम’ (Rekhachithram) या रहस्यमयी क्राईम थ्रिलरनेही प्रेक्षकांना चकित केले. या चित्रपटात एक बदनाम पोलीस अधिकारी आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करत असताना एका जुन्या रहस्याला सामोरा जातो. जसजसा तपास पुढे जातो, तसतसा भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि त्याला एका भयावह सत्याचा सामना करावा लागतो. या चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांच्या डोक्याला झिणझिण्या आणतो.






