Maratha Reservation | मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई पोलिसांनी जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या कोअर कमिटीला तातडीने मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे आंदोलनाचं भवितव्य काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयाचे आदेश आणि पोलिसांची कारवाई :
मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार आंदोलकांनी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, मुंबईत जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून खारघर, नवी मुंबई येथे पर्यायी ठिकाण उपलब्ध करून देण्याचेही निर्देश दिले होते. या आदेशाची अट मान्य करून जरांगे यांना २९ ऑगस्ट रोजी एक दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र या अटींचं उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी आता नोटीस बजावली आहे.
मुंबई पोलिसांनी कोअर कमिटी सदस्यांना दिलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की, आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी फक्त एका दिवसापुरती होती. त्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्यात आलं असून, हे न्यायालयीन आदेश आणि ‘जाहिर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम २०२५’ यांचं उल्लंघन आहे. त्यामुळे मैदान तातडीने रिकामं करावं, असा आदेश पोलिसांनी दिला आहे. शिवाय जरांगे यांनी प्रसारमाध्यमांवर केलेल्या काही विधानांचाही उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. (Manoj Jarange Patil)
Maratha Reservation | कोअर कमिटीचा दावा :
या प्रकरणावर जरांगे यांच्या कोअर कमिटीने वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यानुसार, “अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही” असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलन थांबवायचं की पुढे चालू ठेवायचं याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (Maratha Reservation)
मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे यांनी घेतलेला निर्धार आणि आता न्यायालय-प्रशासनाने दाखवलेली कठोर भूमिका यामुळे आंदोलनाचं भवितव्य प्रश्नचिन्हात आलं आहे. एकीकडे न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन न करण्याचा दबाव आहे, तर दुसरीकडे समाजाच्या भावनांचा विचार आहे. त्यामुळे जरांगे पुढचा निर्णय काय घेणार, याकडे सर्व महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.






