Maratha Reservation | मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाला आता निर्णायक वळण लागलं आहे. सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर सरकारने कठोर पावले उचलली असून, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांना आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावली आहे. परंतु जरांगे यांनी या नोटीसीला थेट विरोध दर्शवत ठाम इशारा दिला – “मी मेलो तरी मैदान सोडणार नाही.” (Maratha Reservation)
पोलिसांनी व्यासपीठावर जाऊन दिली नोटीस :
आज (२ सप्टेंबर) दुपारी काही पोलीस अधिकारी थेट आझाद मैदानात दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम ही नोटीस मराठा समाजाच्या वकिलांना दाखवली आणि त्यानंतर व्यासपीठावर जाऊन झोपेत असलेल्या मनोज जरांगेंना जागं करून नोटीस त्यांच्या हातात दिली. या कारवाईनंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले होते, “मी मेलो तरी मराठ्यांना ओबीसीतून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही. सरकार कितीही थराला जाऊ दे, मी त्या थराला जायला तयार आहे. मला जेलमध्ये टाकलं तरी मी उपोषण सुरूच ठेवीन.”
मात्र काही वेळातच पोलिसांनी मैदान खाली करण्याची नोटीस बजावली. त्यामुळे चिघळलेले वातावरण आणखी तापले आहे.
Maratha Reservation | पोलिसांच्या नोटीसमध्ये काय म्हटलंय? :
मुंबई पोलिसांच्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की – २९ ऑगस्टपासून सुरु असलेल्या उपोषणादरम्यान अनेक उल्लंघनं झाली. या आंदोलनामुळे सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षितता आणि आवश्यक सेवा पुरवठा यामध्ये गंभीर अडथळे निर्माण झाले. मनोज जरांगेंनी दिलेल्या अर्जानुसार परवानगी नाकारण्यात आली असून, आझाद मैदान तात्काळ रिकामं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Maratha Reservation)
याप्रकरणी मराठा आंदोलनाचे सहनेते विरेंद्र पवार यांनी सांगितले की, “पोलिसांनी नोटीस दिली आहे आणि तातडीने मैदान रिकामं करण्यास सांगितलं आहे. पण ताबडतोब म्हणजे नेमकं कधीपर्यंत? याबाबत स्पष्टता नाही. आम्ही कोर्टात जाणार आहोत. या नोटीसीला न्यायालयात चॅलेंज करू.”






