Mumbai Metro | गणेशोत्सव काळात मुंबईकरांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) ने वर्सोवा-घाटकोपर मार्गावरील मेट्रो 1 सेवा आता रात्री १ वाजेपर्यंत धाववण्याचा निर्णय घेतला आहे. ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. यामुळे उशिरा रात्री बाप्पाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होणार आहे. (Mumbai Metro Extended Timings)
सुधारित वेळापत्रक :
आतापर्यंत वर्सोवातून घाटकोपरकडे शेवटची मेट्रो ११:२५ वाजता सुटत होती, तर घाटकोपरहून वर्सोवाकडे शेवटची मेट्रो ११:३० वाजता धावत होती. मात्र गणेशोत्सवाच्या काळात हे वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. आता वर्सोवातून घाटकोपरकडे शेवटची मेट्रो रात्री १२:१५ वाजता सुटेल, तर घाटकोपरहून वर्सोवाकडे शेवटची मेट्रो १२:४० वाजता धावेल.
मुंबईतील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. लाखो भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उशिरापर्यंत रांगेत उभे राहतात. अशा वेळी मेट्रो सेवा रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय म्हणजे भाविकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
Mumbai Metro | गर्दी व्यवस्थापनाची तयारी :
मुंबई मेट्रो प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तयारी केली आहे. स्टेशनवरील मनुष्यबळ वाढवण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त गाड्याही सोडल्या जातील. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुरक्षित होईल. (Mumbai Metro Extended Timings)
गणेशोत्सव काळात बस आणि लोकल सेवांवर प्रचंड ताण असतो. या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवा वाढवण्याचा निर्णय हा सार्वजनिक वाहतुकीवरील ताण काही प्रमाणात कमी करणारा ठरणार आहे. मुंबईकरांनी या अतिरिक्त सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.






