Arun Gawli Bail | मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात गवळीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. (Arun Gawli Bail News)
17 वर्षांची शिक्षा आणि वयाचा विचार :
अरुण गवळीला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो मागील 17 वर्षांपासून कारागृहात शिक्षा भोगत होता. सध्या त्याचे वय 76 वर्षे असून, वय आणि अपील प्रलंबित असल्याचा विचार करून न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र त्याच्या जन्मठेपेवरील अपील अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे.
गवळी आणि त्याच्या टोळीवर खंडणी, अपहरण, धमक्या देणे आणि मालमत्ता बळकावणे यासारखे गंभीर आरोप आहेत. मुंबईतील लालबाग, परळ, भायखळा, करीरोड, दगडी चाळ, सातरस्ता, माजगाव या भागात त्याचा मोठा प्रभाव आहे. (Arun Gawli Bail News)
सन 2004 मध्ये दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीत गवळीने उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी त्याला तब्बल 92 हजार मते मिळाली होती, ज्यामुळे त्याचा राजकीय प्रभावही अधोरेखित झाला होता.
Arun Gawli Bail | कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण :
– 2007 मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळी अटकेत गेला.
– जामसंडेकर यांचा प्रॉपर्टीवरून सदाशिव सुर्वे याच्याशी वाद होता.
– सदाशिवने गवळीच्या माध्यमातून हत्या करण्यासाठी सुपारी दिली.
– ही सुपारी गवळीने प्रताप गोडसेला दिली. त्याने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांना सुपारी दिली.
– 2 मार्च 2007 रोजी, जामसंडेकर यांच्या राहत्या घरी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
– या प्रकरणात दोषी ठरून गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
गवळीला जामीन मिळाल्याने तो तुरुंगातून बाहेर येणार असला तरी, त्याच्यावरचे आरोप अजूनही कायम आहेत. न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे. ‘डॅडी’ तुरुंगाबाहेर येत असल्याने मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये पुन्हा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.






