Mumbai Accident News | मुंबईत गणेश विसर्जनाच्या तयारीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच लालबाग राजाच्या परिसरातून एक धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली आहे. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भरधाव वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडलं. या अपघातात दोन वर्षांच्या चंद्रा वजणदार हिचा जागीच मृत्यू झाला, तर 11 वर्षीय शैलू वजणदार गंभीर जखमी असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Mumbai Accident News)
अपघाताची वेळ आणि परिस्थिती :
ही घटना शनिवारी पहाटे अंदाजे चारच्या सुमारास घडली. दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपलेली असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्यावर थेट गाडी घातली. अपघातानंतर मदत न करता तो चालक घटनास्थळावरून फरार झाला.
लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या तयारीमुळे परिसरात मोठी गर्दी होती. अपघाताची माहिती कळताच नागरिकांनी धाव घेत मुलांना तातडीने परळच्या केईएम रुग्णालयात दाखल केले.
Mumbai Accident News | नागरिकांमध्ये संताप :
या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार वाहनचालक आणि गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत झाले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून साक्षीदारांचे जबाबही पोलिस घेत आहेत.
गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वीच घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळ सोडून दिला यावरून नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.






