Muhurat Trading 2025 | दिवाळी म्हटलं की गुंतवणूकदारांसाठी खास असणारा “मुहूर्त ट्रेडिंग” हा शेअर बाजाराचा सोहळा नेहमीच चर्चेत असतो. भारतीय परंपरेनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आयोजित होणाऱ्या या विशेष ट्रेडिंग सत्राबाबत यंदा महत्त्वाचा बदल झाला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) अधिकृत परिपत्रक जारी करून मुहूर्त ट्रेडिंग 2025 च्या तारखेची आणि वेळेची घोषणा केली आहे. (Muhurat Trading Date Time)
21 ऑक्टोबरला होणार विशेष सत्र :
परिपत्रकानुसार, यंदा मुहूर्त ट्रेडिंग 21 ऑक्टोबर 2025 (दिवाळी पाडवा) रोजी होणार आहे. गेल्या वर्षी (2024) हे सत्र 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता झाले होते. परंतु, यंदा हा शुभ मुहूर्त दुपारी ठेवण्यात आला आहे.
प्री-ओपनिंग सत्र : दुपारी 1:30 वाजता
बाजार उघडण्याची वेळ : दुपारी 1:45 वाजता
बाजार बंद होण्याची वेळ : दुपारी 2:45 वाजता
म्हणजेच यंदा सायंकाळी नव्हे तर दुपारी गुंतवणूकदारांना विशेष ट्रेडिंगची संधी मिळणार आहे.
Muhurat Trading 2025 | मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? :
भारतीय पंचांगानुसार दिवाळी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची (New Year) सुरुवात मानली जाते. त्यानिमित्त शेअर बाजारात (Share Market) केवळ एक तासाचं हे विशेष सत्र आयोजित केलं जातं. याला “मुहूर्त ट्रेडिंग” म्हणतात. या सत्रादरम्यान गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं.
मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात 1957 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) कडून झाली. त्यानंतर 1992 पासून NSE नेही या परंपरेचा अवलंब केला. मागील अनेक दशकांपासून गुंतवणूकदार या सत्रात नव्या आर्थिक प्रवासाला सुरुवात करत आहेत.
परंपरेचं सांस्कृतिक महत्त्व :
मुहूर्त ट्रेडिंग केवळ गुंतवणुकीची संधी नाही, तर ते भारतीय परंपरेशी जोडलेलं सांस्कृतिक मूल्य आहे. शुभ मुहूर्तावर गुंतवणूक केल्यास ती संपन्नता आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. या सत्रात केलेल्या गुंतवणुकीला दीर्घकालीन लाभदायक मानलं जातं.






