Bihar Assembly Election 2025 | बहुचर्चित बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
दोन टप्प्यात मतदान :
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या बिहारच्या निवडणुका या दोन टप्प्यांत पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. (Bihar Assembly Election 2025)
पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना 10 ऑक्टोबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 17 ऑक्टोबर आणि 20 ऑक्टोबर अशी असेल. अर्जांची छाननी पहिल्या टप्प्यासाठी 18 ऑक्टोबरला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 21 ऑक्टोबरला होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत पहिल्या टप्प्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 23 ऑक्टोबरपर्यंत राहील.
Bihar Assembly Election 2025 | सध्याची राजकीय परिस्थिती :
सध्या बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जनता दल (युनायटेड) आणि भाजप (BJP) यांचे सरकार आहे. नितीश कुमार 2005 पासून सलग 20 वर्ष बिहारचे मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड) आणि भाजप एकत्र निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात लालू प्रसाद यादव (LaluPrasad Yadav) यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस (Congress) हे पक्ष एकत्र लढत आहेत. लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) सध्या राष्ट्रीय जनता दलाचे नेतृत्व करत आहेत. तर त्यांचे मोठे बंधू तेजप्रताप यादव यांनी बंडखोरी करत स्वतःचा वेगळा पक्ष काढला आहे. (Bihar Assembly Election 2025)
भाजप आणि जनता दल (युनायटेड) यांनी नितीश कुमार त्यांचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील, असे घोषित केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस व राहुल गांधी यांनी मात्र तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार घोषित करण्यास मनाई केली आहे. तसेच प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत कुमार यांनीही स्वतःचा वेगळा पक्ष काढत या निवडणुकीत कंबर कसली आहे.
योगी आदित्यनाथ बिहारमध्ये जोरदार प्रचार करणार :
सध्याच्या आलेल्या राजकीय विश्लेषकांनुसार तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे सर्वात लोकप्रिय दावेदार आहेत, तर त्यापाठोपाठ प्रशांत किशोर आहेत. नितीश कुमार यांची लोकप्रियता मात्र घटल्याचे दिसून येत आहे. भाजपने मात्र ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण कंबर कसली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ बिहारमध्ये जोरदार प्रचार करत आहेत.
सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत बिहारमध्ये प्रचाराचे तापमान चांगलेच वाढणार आहे. निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की, बिहारमधील सर्व राजकीय पक्षांचे नेते, जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. (Bihar Assembly Election 2025)
बिहार निवडणुका दोन टप्प्यांत होत असल्याने राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे घडामोडी पाहायला मिळणार आहेत. निकाल १४ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर कोणाच्या बाजूने जनता कौल देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.






