Monsoon Health Tips | राज्यात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी आता आरोग्याच्या समस्याही डोकं वर काढू लागल्या आहेत. या ऋतूमध्ये हवामानात होणारे बदल, वाढलेली आर्द्रता आणि साचलेलं पाणी यामुळे डेंग्यू, मलेरिया, व्हायरल ताप, फंगल इन्फेक्शन यांसारखे आजार सहज होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. (Monsoon Health Tips)
पावसात भिजणं टाळा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा :
पावसाळ्यात सततचा आर्द्रपणा आणि तापमानातील चढ-उतार यामुळे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी-खोकला, ताप यासारख्या तक्रारी वाढतात. त्यामुळे पावसात भिजल्यास कपडे ताबडतोब बदला आणि गरम पाणी प्या. हळद टाकलेलं दूध, तुळस-आल्याचा चहा आणि फळांचे नियमित सेवन केल्याने शरीरात प्रतिकारशक्ती वाढते. वेळेवर झोप आणि योगासने-प्राणायाम यांचा समावेश दिवसचर्येत करावा.
पावसाळ्यात अन्न पटकन खराब होतं, त्यामुळे विषबाधा, अतिसार, टायफॉइडसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो घरचं ताजं अन्न खावं आणि बाहेरचं फास्ट फूड टाळावं. पाणी नेहमी उकळून किंवा फिल्टर करूनच प्यावं. हात नियमितपणे धुणं, स्वयंपाकघर आणि पिण्याच्या पाण्याच्या परिसरात स्वच्छता राखणं आवश्यक आहे.
Monsoon Health Tips | फंगल इन्फेक्शन आणि सांधेदुखीपासून बचाव :
पावसाळ्यात घाम आणि आर्द्रतेमुळे त्वचाविकार होण्याची शक्यता वाढते. अंडरआर्म्स, पाय, आणि कमर या भागात फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. यासाठी कॉटनचे सैलसर कपडे वापरावेत, शरीर कोरडं ठेवावं आणि आवश्यक असल्यास अँटी-फंगल पावडर किंवा क्रीम वापरावी. याशिवाय सांधेदुखी आणि कंबरदुखी वाढू शकते. गरम पाण्याचा शेक आणि व्यायाम उपयुक्त ठरतो. (Monsoon Health Tips)
लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेत कमी असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या. भिजल्यास कपडे ताबडतोब बदलावेत, घराबाहेर जाताना छत्री, रेनकोट वापरावा. पावसात साचलेल्या पाण्यापासून दूर राहावं. वृद्धांनी गरम पाणी प्यावं, हलका आहार घ्यावा आणि वेळेवर औषधे घ्यावीत.
डासांपासून संरक्षण अत्यावश्यक :
पावसात साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढते. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूचा धोका अधिक असतो. घरात मच्छरदाणी किंवा मॉस्किटो रिपेलेंटचा वापर करा. घराजवळील झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठू देऊ नका. परिसर कायम स्वच्छ आणि कोरडा ठेवा.






