Mohan Bhagwat | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील वाढत्या व्यापारीकरणावर थेट भाष्य करत समाजाला आणि प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे. इंदूर येथील एका कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिक्षण आणि आरोग्य या दोनही सुविधा आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
भागवत म्हणाले की, “ज्ञानाच्या युगात शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी माणूस घर विकूनसुद्धा आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यायला तयार असतो. त्याचप्रमाणे, आरोग्यासाठीही लोक आपली संपूर्ण बचत खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पण दुर्दैवाने आज या दोन्ही सुविधा ना स्वस्त आहेत, ना सहज उपलब्ध.”
व्यापारीकरणामुळे सामान्य माणसावर ताण :
भागवत यांच्या मते, देशात शाळा आणि रुग्णालयांची संख्या वाढत असली तरी त्या सेवा सर्वसामान्यांना परवडतील अशा राहिलेल्या नाहीत. पूर्वी शिक्षण आणि आरोग्य हे सेवाभावातून चालणारे क्षेत्र होते, मात्र आता त्यांचे पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे. “जेव्हा कोणतेही क्षेत्र व्यवसाय बनते, तेव्हा ते हळूहळू सामान्य माणसाच्या आर्थिक क्षमतेच्या बाहेर जाते,” असे ते म्हणाले.
त्यांनी उदाहरण देत सांगितले की, अलीकडील एका अहवालानुसार भारताची शिक्षण व्यवस्था आता ‘ट्रिलियन डॉलर्स’चा व्यवसाय बनली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण झाल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सेवा केवळ सक्षम आर्थिक गटापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत.
Mohan Bhagwat | सुधारणा आणि जनजागृतीची गरज :
कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांनी भागवत यांचे विधान केवळ टीका नसून सुधारण्याचा संदेश देणारे असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी शिक्षण व आरोग्य क्षेत्र अधिक परवडणारे आणि सर्वांसाठी सुलभ करण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरजही अधोरेखित केली.
देशभरात सध्या खासगी शाळांच्या वाढत्या फी, तसेच खासगी रुग्णालयांच्या महागड्या उपचारांच्या खर्चावर चर्चा सुरू आहे. ग्रामीण भागात तर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांना शहरी भागावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत भागवत यांचे विधान हे एक गंभीर सामाजिक वास्तव मांडणारे ठरले आहे.






