Rupali Chakankar | राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) असे मृत महिलेचे नाव असून, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी तिचा छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी अजित पवार आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुळशी तालुक्यातील भूकुम येथे १६ मे रोजी ही घटना घडली. या प्रकरणी वैष्णवीच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, हुंड्यासाठी तिचा छळ झाल्याचा आरोप केला आहे.
शालिनी ठाकरेंची टीका
शालिनी ठाकरे यांनी हुंडा या सामाजिक समस्येवर बोट ठेवताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरोगामीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या, “पुण्यात राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे ह्यांची सून वैष्णवीने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केली. २०२५ मध्येही हुंड्याची घृणास्पद प्रथा अजित दादांच्या पक्षातील लोक चालवत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणून १५०० रुपये द्यायचे आणि त्यांच्याच पक्षातील नेते हुंड्याची मागणी करतात, हे अत्यंत नीच मानसिकतेचे प्रदर्शन आहे.”
शालिनी ठाकरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “एरवी चित्रपटात एखादा बोल्ड सीन आला की बंदी आणि कारवाईची मागणी करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आता कुठे आहेत? ह्या प्रकरणी महिला आयोगाने तातडीने कारवाई करावी आणि जनजागृती मोहीम राबवावी, अशी माझी मागणी आहे. ह्या प्रकरणी कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
या प्रकरणी पोलिसांनी शशांक राजेंद्र हगवणे (पती), राजेंद्र तुकाराम हगवणे (सासरे), लता राजेंद्र हगवणे (सासू), करिश्मा राजेंद्र हगवणे (नणंद) आणि सुशील राजेंद्र हगवणे (दीर) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
English Title: MNS Slams Ajit Pawar and Rupali Chakankar over NCP Leader’s Daughter-in-Law Suicide






