Pune News | पुण्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोइंगला वेग आला आहे. याच घडामोडींमध्ये, भाजप (BJP) आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचा मुलगा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुणे जिल्ह्याच्या (Pune District) राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सुरेंद्र पठारे भाजपच्या संपर्कात?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे (Wadgaon Sheri Assembly Constituency) आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांचे पुत्र सुरेंद्र पठारे (Surendra Pathare) हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असे म्हटले जात आहे. या संदर्भात सुरेंद्र पठारे यांची भाजपच्या पुण्यातील काही बड्या नेत्यांसोबत विमान नगर परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याचीही माहिती आहे.
या बैठकीनंतर पुण्याचे भाजपचे बडे पदाधिकारी आपल्या इच्छुकांना सुरेंद्र पठारे हे तुमचे पॅनल प्रमुख असतील, त्यामुळे त्यांच्या भेटी घ्या, असे खासगीत सांगत असल्याची माहिती मिळत आहे. प्रभाग क्रमांक २, ३, ४ मध्ये त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली, तरच सुरेंद्र पठारे प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. पठारे यांनी भाजपच्या शहरातील काही ‘कारभारी’ नेत्यांची नुकतीच भेट घेतल्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आले आहे.
सुरेंद्र पठारे यांची प्रतिक्रिया
या चर्चांवर सुरेंद्र पठारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. याआधी मी १ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा काही लोक करत होते, त्यानंतर ४ तारखेला माझा प्रवेश होईल अशाही चर्चा केल्या. हे दोन मुहूर्त हुलकल्यानंतर आता २२ तारखेला माझा प्रवेश होणार होता, असेही बोलले गेले. मात्र, प्रवेश करायचा असेल तर मला घेऊनच होईल ना? पण मलाच माझ्या प्रवेशाची कल्पना नाही, या केवळ वावड्या आहेत.”






