विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात दाखल

On: December 10, 2025 2:18 PM
Sharad Sonawane
---Advertisement---

Sharad Sonawane | राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांनी नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. कारण शेतात हल्ले, लहान मुलांच्या जीविताला धोका या सर्व घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अशा अनेक भागात बिबट्यांची मोठी संख्या असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर जिथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे, त्या नागपूरपरिसरात देखील बिबट्यांची दहशत वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांनी एक अनोखा मार्ग निवडला आहे, तो म्हणजे ते थेट बिबट्याचा वेष परिधान करून विधानभवनात दाखल झाले आहेत.

आमदारांच्या या पेहरावाने नागपूरमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आले आहे. सोनवणे यांनी विधानभवनात प्रवेश करताच उपस्थितांचे लक्ष वेधले आणि त्यांनी बिबट्यांच्या हल्ल्यांविषयी सरकारला तातडीने कठोर निर्णय घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते बिबट्यांची संख्या अनियंत्रित वाढत असून सरकारने केवळ उपाययोजनांवर चर्चा न करता प्रत्यक्ष कारवाई सुरू करणे आवश्यक आहे. (Maharashtra Wildlife Issue)

राज्यात 9-10 हजार बिबटे? :

आमदार शरद सोनवणे यांनी विधानभवनात सांगितलं की, राज्यात तब्बल 9 ते 10 हजार बिबट्यांची संख्या असल्याचा त्यांचा दावा आहे. विशेषतः जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत 55 जणांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले. नागरिकांना संरक्षण देण्याऐवजी सरकार महिलांना, मुलांना आणि शेतकऱ्यांना लोखंडी पट्टा घालण्याचा सल्ला देते, अशी टीकाही त्यांनी केली. अनेक भागांत लहान मुले शाळेत जाण्यास घाबरतात, तर नागरिक घराजवळसुद्धा सुरक्षितपणे फिरू शकत नाहीत, असे गंभीर वास्तव त्यांनी मांडले.

काही भागांमध्ये बिबटे ऊसाच्या शेतात, तर काही ठिकाणी थेट घरांच्या परिसरात दिसू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सचिव आणि प्रशासकीय यंत्रणा एसी खोलीत बसून निर्णय घेतात; खरं संकट नागरिकांना भोगावं लागतं, असा आरोपही आमदारांनी केला.

Sharad Sonawane | रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी :

या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून आमदार सोनवणे यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन राबविण्याची मागणी केली. त्यांनी सरकारला तीन महिन्यांत दोन मोठी रेस्क्यू सेंटर्स उभारण्याचे आवाहन केले आहे. एक जुन्नरमध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये. या सेंटर्समध्ये दोन हजारपर्यंत बिबट्यांना ठेवण्याची क्षमता असावी आणि नर-मादी वेगळे ठेवून नसबंदीची योजना राबविण्यात यावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला.

बिबट्यांचे हल्ले (Leopard Attacks) हा आता व्यक्तिगत किंवा विभागीय प्रश्न नसून राज्यव्यापी आपत्ती आहे, असे आक्रमक विधान सोनवणे यांनी केले. त्यामुळे या हल्ल्यांना “राज्य आपत्ती” घोषित करण्याची त्यांनी मागणी केली. “यापुढे एकाही नागरिकाचा बळी आम्हाला मान्य नाही,” असा कडक इशारा त्यांनी सरकारला दिला. जंगलात मानवांनी अतिक्रमण केलं नाही, तर बिबट्यांनीच मानवी वस्तीत प्रवेश केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर आवश्यक नियंत्रण ठेवणे राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Wildlife Issue)

विधानभवनातील या अनोख्या वेशभूषेमुळे आणि आक्रमक मागण्यांमुळे बिबट्यांच्या हल्ल्यांचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे. आता राज्य सरकार या मागण्यांवर कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

News Title: MLA Enters Assembly Dressed as Leopard; Demands Rescue Centres and Declaring Leopard Attacks as State Emergency

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now