Babasaheb Patil | सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) हे आपल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर टीका करणारे पाटील, आता कार्यकर्त्यांसाठी ‘बँका खाली करू’ असे आश्वासन देताना दिसले. नांदेड येथील एका कार्यक्रमात केलेल्या या विधानामुळे त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवडणुकीसाठी ‘बँका खाली’ करण्याचे आश्वासन :
नांदेड (Nanded) येथे राष्ट्रवादी पक्षाच्या (NCP) एका कार्यक्रमात बोलताना मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांचा वेगळाच उत्साह दिसून आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना त्यांनी पैशांची चिंता न करण्याचे आवाहन केले. “तुम्ही फक्त निवडणुकीत उभे राहा, तुमच्यासाठी बँकाच खाली करून टाकू,” असे धक्कादायक आश्वासन त्यांनी दिले.
त्यांच्या या मिश्किल वक्तव्याने मोठा गोंधळ उडाला. बँकांचा वापर पक्ष कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी केला जातो का, असा थेट प्रश्न उपस्थित झाला. बोलण्याच्या ओघात आपण काय बोलून गेलो हे चाणाक्ष मंत्र्याच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने सारवासारव केली. आपण ‘विकासासाठी’ बँका खाली करू, असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, तोपर्यंत त्यांच्या ‘मनातील इंगित’ ओठांवर आले होते, अशी टीका होत आहे.
Babasaheb Patil | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मात्र संताप :
कार्यकर्त्यांसाठी ‘दिलदार’ झालेल्या पाटलांची शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र वेगळी भूमिका होती. काही दिवसांपूर्वीच चोपडा (Chopda) तालुक्यातील घोडगाव (Ghodgaon) येथे एका बँकेच्या उद्घाटन कार्यक्रमात, त्यांनी कर्जमाफीवर संतापजनक वक्तव्य केले होते. “लोकांना कर्जमाफीचा नादच लागला आहे,” अशी खळखळ त्यांनी व्यक्त केली होती.
निवडणुकीत निवडून येण्यासाठी गावात नदी आणण्याचे खोटे आश्वासन कसे दिले जाते, याचे उदाहरण देत त्यांनी मतदारांना कसे वेड्यात काढले जाते हे सांगितले होते. त्यांच्या या कर्जमाफीवरील विधानामुळे राज्यभर टीका झाल्यानंतर, बाबासाहेब पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, आता कार्यकर्त्यांसाठी बँका रिकाम्या करण्याची भाषा केल्याने त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






