Pune News | पुणे शहरातील बंडगार्डन येथील पंचतारांकित हॉटेलमधील एका पबमध्ये सरकारी नियमांचे उल्लंघन करत रात्री दीडनंतरही मद्यविक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला. संबंधित पब ‘शेरेटन’ हॉटेलमधील ‘टॉयरूम’ या नावाने ओळखला जातो.
तक्रारीनंतर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई :
राज्य सरकारने ठरवून दिलेल्या वेळेनंतर कोणत्याही पबमध्ये किंवा हॉटेलमध्ये मद्यविक्री करण्यास मनाई आहे. मात्र, या नियमांचा बोजवारा उडवत बंडगार्डन येथील ‘टॉयरूम’ पबमध्ये पहाटे तीन वाजेपर्यंत मद्यविक्री सुरू होती. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (MNS) उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत विभागाच्या पथकाने तत्काळ छापा टाकला आणि नियमभंग उघडकीस आला.
उत्पादन शुल्क विभागाचे पुण्याचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितले की, “या पबमध्ये ठरवलेल्या वेळेनंतरही मद्यविक्री सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित पबला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात आली असून, त्यावर आलेल्या उत्तरानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.” या कारवाईमुळे शहरातील इतर पब-मालकांमध्येही खळबळ उडाली आहे.
Pune News | मनविसेची मागणी; नियमभंग करणाऱ्या पबवर कायमस्वरूपी बंदी घालावी :
या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी (Dhananjay Dalavi) आणि कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “शहरातील काही पबमालक सरकारी नियमांची पायमल्ली करून कायद्याला आव्हान देत आहेत. अशा ठिकाणांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी आणि परवाना रद्द करण्यात यावा.”
मनविसेच्या या भूमिकेला नागरिकांचाही पाठिंबा मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पबमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईच शहरात शिस्त प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे नागरिकांचे मत आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईनंतर इतर पब-मालकांनीही सावध भूमिका घेतली असून, प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे पुण्यातील नाईटलाइफवर नियंत्रण आणण्याच्या सरकारी प्रयत्नांना चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






