MHADA Pune Lottery | पुणे (Pune) आणि आसपासच्या परिसरात परवडणाऱ्या दरात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने (MHADA) दिलासा दिला आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने ४१८८ सदनिकांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी किंवा इतर कारणांमुळे अर्ज करू न शकलेल्या हजारो इच्छुकांना आणखी एक संधी मिळाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर :
विविध गृहनिर्माण योजनांमधील ४१८८ घरांसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अनेक नागरिकांनी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या सोयीसाठी आणि अधिकाधिक लोकांना संधी मिळावी या उद्देशाने, म्हाडाच्या पुणे (Pune) मंडळाने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत वाढवली आहे.
या मुदतवाढीमुळे ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीखही २० नोव्हेंबर २०२५ झाली आहे. तसेच, जे अर्जदार RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरणार आहेत, त्यांना २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत रक्कम भरता येईल. सुधारित वेळापत्रकानुसार, या घरांसाठीची संगणकीय सोडत आता ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता काढण्यात येईल.
MHADA Pune Lottery | विविध योजनांतर्गत ४१८८ घरे उपलब्ध :
या सोडतीमध्ये पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीसह सोलापूर (Solapur), कोल्हापूर (Kolhapur) आणि सांगली (Sangli) जिल्ह्यातील एकूण ४१८८ सदनिकांचा समावेश आहे. यामध्ये म्हाडा (MHADA) गृहनिर्माण योजनेतील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (First Come First Serve) तत्वावरील १६८३ सदनिका आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) (शहरी) अंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावरील २९९ सदनिका उपलब्ध आहेत.
याव्यतिरिक्त, १५% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पीएमआरडीए (PMRDA) हद्दीतील ८६४ सदनिका आणि २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) व पीएमआरडीए (PMRDA) हद्दीतील १३४० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अर्ज नोंदणी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. मदतीसाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल. मंडळाने कोणत्याही एजंटची नियुक्ती केली नसल्याने फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन मुख्य अधिकारी राहुल साकोरे (Rahul Sakore) यांनी केले आहे.






