MHADA Lottery 2026 | मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वतःचे घर घेणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांचा मुख्य आधार म्हणजे म्हाडा प्राधिकरण. दरवर्षी म्हाडामार्फत विविध मंडळांच्या माध्यमातून घरांची लॉटरी काढली जाते, मात्र यावर्षी मुंबई मंडळाची लॉटरी न निघाल्याने इच्छुकांमध्ये नाराजी होती.
मात्र नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई आणि ठाणे परिसरात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2026 मध्ये म्हाडाच्या कोकण मंडळासह मुंबई मंडळाकडून हजारो घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी महिन्यांत घर खरेदीची संधी पुन्हा उपलब्ध होणार आहे. (MHADA Lottery 2026)
कोकण मंडळाची लॉटरी कधी निघणार? :
ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात घर शोधणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते मार्च 2026 या कालावधीत कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. या सोडतीत दोन हजारांहून अधिक घरांचा समावेश असण्याची शक्यता असून मंडळाकडून सध्या त्यासाठी तयारी सुरू आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर अधिकृत घोषणा केली जाणार असून, त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला लॉटरी काढली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सोडतीत सर्वसमावेशक योजनेतील 20 टक्के घरांना मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
MHADA Lottery 2026 | मुंबई मंडळाची लॉटरी कधी निघणार? :
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीकडे देखील घर खरेदी इच्छुकांचे लक्ष लागले आहे. 2025 मध्ये मुंबई मंडळाची सोडत न निघाल्याने अनेक नागरिक नाराज होते. मात्र कोकण मंडळानंतर मुंबई मंडळही 2026 मध्ये लॉटरी काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. (MHADA Mumbai Board)
स्वतः म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मार्च 2026 मध्ये मुंबई मंडळाकडून हजारो घरांसाठी लॉटरी काढली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. मात्र सध्या प्रत्यक्ष हालचाली कमी दिसत असल्याने लॉटरीची नेमकी तारीख काय असेल, याबाबत उत्सुकता कायम आहे. तरीही आगामी वर्षात मुंबई-ठाणे परिसरात म्हाडामार्फत घर घेण्याची संधी पुन्हा उपलब्ध होणार, हे निश्चित मानले जात आहे.






