MHADA Lottery 2026 | स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाकडून मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. म्हाडा कोकण मंडळ 2026 मध्ये 2000 हून अधिक घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करणार असून, यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील घरखरेदीदारांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. घरांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ही लॉटरी मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या लॉटरीची अधिकृत जाहिरात फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि एप्रिल किंवा मे महिन्यात सोडतीचा निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न प्रत्यक्षात उतरू शकते.
फेब्रुवारीत जाहिरात, उन्हाळ्यात निकाल :
म्हाडा लॉटरीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. कोकण मंडळाने पुढाकार घेत फेब्रुवारी 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यानंतर काही आठवड्यांतच सोडतीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
याआधी 2025 मध्ये काढण्यात आलेल्या कोकण मंडळाच्या (Konkan Board MHADA) लॉटरीला तब्बल दीड लाख अर्ज मिळाले होते. यावरूनच म्हाडाच्या घरांबद्दल नागरिकांमध्ये किती मोठी मागणी आहे हे स्पष्ट होते. यंदाही या लॉटरीला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
MHADA Lottery 2026 | ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात घरे :
या लॉटरीत प्रामुख्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि घोटेघर परिसरातील घरांचा समावेश असणार आहे. मुंबईला लागून असलेल्या या भागांत वाहतूक सुविधा आणि कनेक्टिव्हिटी चांगली असल्याने घरांना मोठी मागणी असते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. (MHADA Lottery 2026)
या सोडतीत सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत खासगी विकासकांकडून मिळणाऱ्या 15% आणि 20% कोट्यातील घरांचा समावेश असेल. यासोबतच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी परवडणारी घरेही उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे विविध उत्पन्न गटांतील नागरिकांना या लॉटरीचा लाभ घेता येणार आहे.






