MHADA Lottery | स्वतःचं घर असावं ही प्रत्येक सर्वसामान्याची पहिली इच्छा असते. मात्र, वाढत्या घरांच्या किमतींमुळे अनेकांना हे स्वप्न पूर्ण करणं कठीण असतं. घरांच्या महागाईमुळे मध्यमवर्गी कुटुंबांना परवडेल अशा घरांचा शोध घेणं ही मोठी डोकेदुखी ठरते.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा पुन्हा एकदा घरांच्या लॉटरीसह सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण घेऊन आलं आहे. राज्यभरात तब्बल ११,५०० घरांची निर्मिती होणार असून, यातील मोठा हिस्सा मुंबईसह इतर प्रमुख शहरांत सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
राज्यभरात आणि मुंबईत किती घरांना मंजुरी? :
म्हाडाकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार, या आर्थिक वर्षात ११ हजार ५०० घरांच्या बांधकाम प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या घरांची निर्मिती अल्पदरात करून ती लॉटरीच्या माध्यमातून विक्रीसाठी खुली करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांना घर उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पावले उचलली असून, म्हाडाने दोन लाख घरांच्या निर्मितीचा संकल्प केला आहे. (MHADA Lottery 2025)
मुंबईसारख्या महागड्या शहरात घर घेण्याचं स्वप्न अनेकांसाठी अशक्य मानलं जातं. मात्र, म्हाडाने मंजूर केलेल्या या घरांमुळे मुंबईतील तब्बल १,४७४ घरांना हिरवा कंदील मिळाला आहे. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी १०९ घरे, अल्प उत्पन्न गटासाठी ७८९ घरे, मध्यमवर्गीयांसाठी ४३७ घरे आणि उच्च उत्पन्न गटासाठी १३९ घरे अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच उत्पन्न गटांतील नागरिकांना परवडणारी घरे मिळण्याची संधी मिळणार आहे.
गिरणी कामगारांसाठी ४,२१५ घरांची निर्मिती करण्याची शक्यता :
याशिवाय, मुंबईतील गिरणी कामगारांसाठी ४,२१५ घरांची निर्मिती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप बाकी असला तरी, यामुळे मोठ्या संख्येने गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. म्हाडा झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून, त्या बदल्यात घरांची निर्मिती करण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना घरे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. (MHADA Lottery 2025)
म्हाडाकडून घेतलेले हे पाऊल सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. वाढत्या महागाईत आणि घरांच्या अव्वाच्या सव्वा किमतींमध्ये, म्हाडाची घरे म्हणजे सर्वसामान्यांना आपलं स्वतःचं आणि हक्काच घर मिळवण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे. मुंबईसह राज्यभरात उपलब्ध होणारी ही ११,५०० घरे हजारो कुटुंबांचं आयुष्य बदलून टाकतील, यात शंका नाही.






