MHADA | मुंबईकरांसाठी विशेषतः अंधेरी (पश्चिम) रहिवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल (एस.पी.व्ही. नगर) वसाहतीच्या पुनर्विकास योजनेला राज्य मंत्रिमंडळाची अखेर मंजुरी मिळाली आहे. म्हाडाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जाणार असून यामुळे तब्बल 4,973 कुटुंबांना नवीन, प्रशस्त आणि आधुनिक घरे मिळणार आहेत. (MHADA Andheri Redevelopment Plan Approved)
कसा असणार पुनर्विकासाचा आराखडा? :
ही योजना वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीतील आदर्श नगर पुनर्विकास प्रकल्पांच्या धर्तीवर तयार करण्यात आली आहे. प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन होणार आहे.
या वसाहतीचे भूखंड 1993 मध्ये जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत वाटप झाले होते. येथे सध्या 98 सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. याशिवाय 24 भूखंड उच्च उत्पन्न गटातील अपार्टमेंटसाठी, 60 चौरस मीटरचे 62 भूखंड आणि 100 चौरस मीटरचे 245 भूखंड वैयक्तिक वाटपात आहेत.
MHADA | रहिवाशांना काय मिळणार? :
या पुनर्विकासामुळे अंधेरीकरांना केवळ प्रशस्त घरेच नव्हे तर आधुनिक जीवनशैलीला साजेशा सुविधा मिळतील. टाऊनशिपच्या धर्तीवर या भागात हरित क्षेत्र, शाळा, आरोग्य केंद्रे आणि व्यावसायिक जागांचे नियोजन होईल. तसेच खेळाची मैदाने, करमणुकीची मैदाने, व्यायामशाळा, जलतरण तलाव, सभागृह आणि विविध संस्था कार्यालये उभारली जाणार आहेत. (MHADA Andheri Redevelopment Plan Approved)
या योजनेत पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि वीज यांसारख्या आवश्यक सोयींचे आधुनिकीकरण केले जाईल. ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेनुसार सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण आणि कचरा व्यवस्थापनावर विशेष भर दिला जाणार आहे. यामुळे हा प्रकल्प पर्यावरणपूरक ठरेल.
अंधेरीकरांसाठी ही योजना म्हणजे मोठा दिलासा आहे. दशकानुदशकं जुने झालेले घरांचे प्रश्न संपुष्टात येणार असून, रहिवाशांना आधुनिक आणि सुरक्षित घरात नवे आयुष्य सुरू करता येणार आहे.






