Hinjewadi Traffic Plan | पिंपरी-चिंचवडमधील आयटी हब असलेल्या हिंजवडी (Hinjewadi IT Park) परिसरात दररोज सकाळ-संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. हजारो आयटी कर्मचारी व रहिवासी या समस्येमुळे त्रस्त आहेत. मात्र लवकरच या कोंडीवर तोडगा निघणार आहे. पोलीस व प्रशासनाने एकत्रितपणे ‘मेगा प्लॅन’ आखला असून प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जाणार आहे. यामुळे गर्दीच्या तासात वाहतूक अधिक सुरळीत, सुरक्षित आणि जलद होणार आहे. (Hinjewadi Traffic Plan)
सकाळ-संध्याकाळसाठी वेगळा रस्ता आराखडा :
योजनेनुसार, सकाळच्या वेळी वाकडहून हिंजवडीकडे (Hinjewadi) जाणाऱ्या मार्गावर तीन मार्गिकांवरून वाहतूक केली जाईल. तर संध्याकाळच्या वेळी हिंजवडीहून वाकडकडे परतताना तीन मार्गिका फक्त परतीसाठी खुल्या राहतील. यासाठी रस्त्यातील दुभाजक तात्पुरते काढले जाणार आहेत. तसेच ठिकठिकाणी साइनबोर्ड लावले जातील, जेणेकरून वाहनचालकांना मार्गक्रमण स्पष्ट दिसेल. (Pimpri Chinchwad traffic update)
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली आणि वाहतूक कोंडीची प्रमुख कारणं तपासली. या वेळी अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील, महापालिकेचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अधिकारी सुनील पवार तसेच वाहतूक विभाग आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी वाहतुकीत अंमलात आणावयाच्या बदलांवर चर्चा करण्यात आली.
Hinjewadi Traffic Plan | पर्यायी रस्त्यांवरही भर :
भोसरी-वाकड बीआरटी मार्ग आणि औंध-रावेत बीआरटी मार्गाद्वारे मोठ्या प्रमाणात वाहने हिंजवडीकडे येतात. त्यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. काही दिवसांपूर्वीच भुजबळ चौकातील उड्डाणपुलावरून दुचाकींना गर्दीच्या तासात प्रवेश बंदी घालण्यात आली होती. आता वाहतुकीची अधिक सुव्यवस्था करण्यासाठी नवीन योजना अमलात आणली जात आहे. (Pune IT park traffic news)
पिंपरी-चिंचवड (Pimpri- Chinchwad) पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले की, या बदलांमुळे वाहतूक अधिक सुरळीत होईल. तर महापालिकेचे अधिकारी सांगतात की अपूर्ण रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करून पर्यायी मार्ग खुले करण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे हिंजवडीसह संपूर्ण वाकड-राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.






