Amol Waghmare | मुंबईतील (Mumbai) पवई (Powai) येथील थरारनाट्य अखेर संपले आहे. १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा (Rohit Arya) एन्काऊंटर करण्यात आला. ही धाडसी कारवाई करणारे पोलीस अधिकारी एपीआय अमोल वाघमारे (API Amol Waghmare) यांच्या शौर्याची चर्चा सुरू आहे. कमांडो ट्रेनिंग घेतलेल्या वाघमारे यांनी शिडीच्या सहाय्याने बाथरूममधून प्रवेश करत आरोपीला रोखले.
असा घडला पवईतील थरार :
पवईतील आरए स्टुडिओत (RA Studio) एका वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी रोहित आर्यने (Rohit Arya) शंभर मुलांना बोलावले होते. गेल्या पाच दिवसांपासून हे ऑडिशन सुरू होते. गुरुवारी, सहाव्या दिवशी, त्याने १७ मुलांना आत डांबून ठेवले आणि बाकीच्यांना घरी पाठवले. दुपारच्या जेवणाची वेळ उलटून गेली तरी मुले बाहेर न आल्याने पालकांना संशय आला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्टुडिओला वेढा घातला. सुरुवातीला दीड ते पावणेदोन तास पोलिसांनी रोहित आर्यशी (Rohit Arya) फोनवर बोलून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने स्टुडिओला आग लावण्याची धमकी दिल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.
Amol Waghmare | कोण आहेत अमोल वाघमारे? :
एपीआय अमोल वाघमारे (API Amol Waghmare) हे गेल्याच महिन्यात पवई पोलीस ठाण्यात (Powai Police Station) रुजू झाले. विशेष म्हणजे, ते क्यूआरटी (QRT – Quick Response Team) म्हणजेच तात्काळ मदतीला धावून येणाऱ्या टीमचे अधिकारी होते. त्यांनी कमांडो ट्रेनिंग घेतले असल्यामुळे, या हाय-रिस्क ऑपरेशनसाठी त्यांनाच आत जाण्याची परवानगी देण्यात आली.
वाघमारे यांनी अग्निशमन दलाच्या उंच शिडीचा वापर करून स्टुडिओच्या बाथरूमची काच फोडून आत प्रवेश केला. आत शिरताच आरोपी रोहित आर्य (Rohit Arya) हा आपल्याकडील शस्त्र काढण्याच्या तयारीत दिसला. मुलांच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच, वाघमारे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्यावर गोळी झाडली, ज्यात रोहितचा (Rohit Arya) मृत्यू झाला आणि सर्व १७ मुलांची सुखरूप सुटका झाली.






