Medha Kulkarni | डॉ. सुश्रुत घैसास यांच्या रुग्णालयात भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी पक्षाच्या शहराध्यक्षांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रात “सोम्या-गोम्या आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कार्यकर्ते कायदा हातात घेत आहेत” असा सणसणीत टोला लगावत पक्षशिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
शहराध्यक्ष घाटेंना पत्र :
मेधा कुलकर्णी यांनी रविवारी भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांना पाठवलेल्या पत्रात डॉक्टर घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकवर करण्यात आलेल्या तोडफोडीबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, “ही कृती पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे. कुणाच्याही जबाबदारीशिवाय केलेले वर्तन पक्षासाठी घातक ठरू शकते.”
Medha Kulkarni यांची हर्षदा फरांदे यांच्यावरही टीका :
पत्रात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे (Harshada Farande) यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करत कुलकर्णी म्हणाल्या, “डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकची तोडफोड करणे हे त्यांच्या व इतर पदाधिकाऱ्यांना शोभणारे नाही.” त्यांनी स्पष्ट केलं की, “प्रसिद्धीच्या मागे लागून कायद्याचा भंग करणे ही पक्षाची नीती नाही.”
या प्रकरणावर आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मात्र महिला पदाधिकाऱ्यांचे समर्थन करत त्यांचं कौतुक केलं आहे. यामुळे पक्षात अंतर्गत मतभेद उफाळून आले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कुलकर्णी पुढे म्हणाल्या, “पक्षाची आणि कार्यकर्त्यांची प्रतिमा तयार होण्यासाठी वेळ लागतो. अशा प्रकारच्या बिनधास्त कृतीमुळे एकूणच पक्षाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. कृतीला नेहमी विचारांची जोड असली पाहिजे.”






