Mayuri Hagawane | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून नुकतीच हकालपट्टी करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांची धाकटी सून वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूनंतर, आता त्यांच्या मोठ्या सुनेने, मयुरी जगताप हगवणे हिने, हगवणे कुटुंबाच्या ‘काळ्या कारनाम्यांचा’ पर्दाफाश केला आहे. माध्यमांशी बोलत असताना मयुरी हगवणे हीने हगवणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.
मयुरी हगवणेनी मारहाण झाल्याचे फोटो दाखवले-
मयुरी (Mayuri Hagawane) हगवणेनी स्वतःला मारहाण झाल्याचे फोटो दाखवले आहेत. यासह त्यांना मारहाण होत असतानाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. मयुरीने जानेवारी महिन्यात यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती, मात्र पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. तसेच, नोव्हेंबरमध्ये महिला आयोगाकडेही यासंदर्भात तक्रार केली होती, असेही त्यांनी सांगितले.
धाकट्या सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर हे प्रकरण समोर आले आहे. मयुरी हगवणे यांनी सांगितले की, वैष्णवी त्यांची जाऊ असून, त्या दोघी कधीही एकमेकांशी बोलल्या नाहीत. “तिच्या मिस्टरांनी आणि माझ्या नणदेने आम्हाला एकमेकींशी कधी बोलू सुद्धा दिलं नाही,” असे मयुरी यांनी नमूद केले. घरात वैष्णवीला मारहाण व्हायची आणि त्रास दिला जायचा, हे त्यांच्या कानावर यायचे. परंतु, तिचा नवरा (मयुरीचा पती) मलाच येऊन मारायचा, त्यामुळे यात आपण काहीच करू शकत नव्हतो, असे मयुरी हगवणे यांनी सांगितले.
मी माझ्या मिस्टरांनाही सांगितलं-
मयुरी हगवणे (Mayuri Hagawane) यांनी पुढे सांगितले की, जे काही चुकीचे घडत होते, त्याला त्यांनी विरोध केला. “मी माझ्या मिस्टरांनाही सांगितलं. त्यानंतर आम्ही वेगळे राहत होतो,” असेही मयुरी हगवणे यांनी स्पष्ट केले. यावरून हगवणे कुटुंबातील महिलांवर कशाप्रकारे अत्याचार होत होते, हे स्पष्ट होते.
राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पदाधिकारी होते, परंतु वैष्णवीच्या मृत्यूनंतर आणि त्यांच्या कुटुंबावरील गंभीर आरोपानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हगवणे कुटुंबातील या अंतर्गत छळाच्या घटना आणि त्यावर पोलिसांकडून तसेच महिला आयोगाकडून कारवाई न होणे, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोठ्या सुनेने आता धाडस दाखवून हे ‘काळे कारनामे’ उघड केल्यामुळे, या प्रकरणातील सत्य समोर येऊन दोषींना कठोर शिक्षा मिळेल अशी अपेक्षा आहे.






